जळगाव : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ६२.०७ ग्रॅम एमडी, एक मोबाईल फोन आणि दुचाकी, असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान या अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या मालेगावातील दुसऱ्या संशयिताचाही सहभाग उघड झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी रात्री सुमारे १०.४० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, वखार महामंडळ (एफसीआय गोडाऊन) परिसरातील सेक्टर क्रमांक ए-१४ समोरील रस्त्यावर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर संशयिताला तात्काळ अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मालेगावातील पुरवठादाराचाही शोध

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव इम्रान खान हयात खान (३६) असे आहे. तो मूळचा आडगाव, ता. जळगाव येथील रहिवासी असून सध्या जळगाव एमआयडीसीतील करीम नगर, फातिमा नगरात वास्तव्यास आहे. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असता रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने विक्रीसाठी एमडीचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले. त्याचे पूर्ण नाव आणि इतर माहिती अद्याप तपासाधीन असून त्याच्याविरुद्धही संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान ३९.०६ ग्रॅम एमडी, ११ प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवलेले ९.१० ग्रॅम एमडी आणि १८ प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवलेले १३.९१ ग्रॅम एमडी, असा एकूण ६२.०७ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आला.

संपूर्ण अमली पदार्थाची एकूण किंमत २ लाख ८८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच संशयितांकडील २० हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीही जप्त करण्यात आली. त्यामुळे या कारवाईतील एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ लाख ५८ हजार रुपयांवर पोहोचली आहे.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ८(क), २२ (क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार अतुल रघुनाथ वंजारी यांनी दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करत आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जळगाव पोलीस दलाची कारवाई सातत्याने सुरू असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी परिसरात अमली पदार्थांची विक्री अथवा तस्करीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.