जळगाव : जिल्ह्यातील गेल्या मंगळवारी बऱ्याच ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसामुळे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या गारपिटीसह वादळी पावसामुळे १० तालुक्यांतील २१ हजारांपेक्षा अधिक हेक्टरवरील केळी, मका, गहू, हरभरा, ज्वारी आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या या तडाख्याने ४५५ गावांमधील २७ हजारांपेक्षा अधिक शेतकरी बाधित झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. पाहणीत सर्वाधिक ८२१९ हेक्टरवरील मका, त्यानंतर ६५७७ हेक्टरवरील गहू, २८२१ हेक्टरवरील ज्वारी, २१०२ हेक्टरवरील केळी, १४०९ हेक्टरवरील हरभरा, ११६ हेक्टरवरील कांदा, १३५ हेक्टरवरील बाजरी आणि ६४ हेक्टरवरील पपई पिकाची हानी झाल्याचे दिसून आले आहे. ही स्थिती लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, गारखेडा, पष्टाने बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील करंज, धानोरा आणि घार्डी या काही गावांमधील नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली.

या पाहणीदरम्यान संबंधित गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आले. याअनुषंगाने त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ते त्यांची नावे तलाठी कार्यालयात नोंदवतील. त्यानंतर प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे पूर्ण करून संबंधित नुकसानग्रस्तांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. अनेक भागात विजेचे खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे तुटलेल्या वीज तारा आणि वाकलेल्या खांबांची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश महावितरणच्या अभियंत्यांना त्यांनी दिले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या समस्या व निवेदने पालकमंत्र्यांकडे सादर केली. पाहणी दौऱ्यादरम्यान पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांच्या अडचणी समजून घेत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, तहसीलदार शीतल राजपूत, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मंडळ अधिकारी आशिष वाघ, ज्योती चौधरी, तालुका कृषी अधिकारी के. एच.देसले, तलाठी जीवनकुमार खोकले, ज्योती लोखंडे तसेच संबंधित गावांचे सरपंच, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.