जळगाव : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही कर्तव्य निभावणारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान जावेद अहमद यांच्या शौर्याची दखल घेत शासनाने ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजना’ अंतर्गत सुमारे ६० लाखांची आर्थिक मदत प्रदान केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा धनादेश त्यांना देण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जावेद अहमद यांच्या शौर्याचा गौरव करत त्यांना सलाम केला.
देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणारे जवान हे राष्ट्राचे खरे बळ आहेत. जावेद अहमद यांच्यासारख्या जवानांचा त्याग, शौर्य आणि निष्ठा ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. अशा वीरांच्या कर्तृत्वामुळेच देश सुरक्षित राहतो. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि भविष्यातही अशा जवानांचा सन्मान करण्यासाठी कटिबद्ध राहील, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांनी तरुणांना देशसेवेचे महत्त्व पटवून देत अशा शूर सैनिकांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावचे सुपुत्र असलेले जावेद अहमद हे सीआरपीएफच्या १७९ बटालियनमध्ये जम्मू-काश्मीरमधील अतिसंवेदनशील बारामुल्ला जिल्ह्यात कार्यरत होते. १८ एप्रिल २०२० रोजी सोपोर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना दहशतवाद्यांनी त्यांच्या वाहनावर अचानक आणि अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले; मात्र धैर्य, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा दाखवत त्यांनी वाहन सुरक्षित ठिकाणी नेले. आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण केली. जीवघेण्या परिस्थितीतही दाखवलेले त्यांचे धैर्य आणि निर्णयक्षमता ही त्यांच्या प्रशिक्षणाची आणि देशनिष्ठेची साक्ष देणारी आहे.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान जावेद अहमद यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने ७४ टक्के कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. मात्र, दीर्घ उपचारानंतरही त्यांनी हार मानली नाही. शारीरिक अडचणींवर मात करत त्यांनी पुन्हा सेवेत रुजू होऊन देशसेवेचे कर्तव्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या या जिद्दीमुळे आणि देशप्रेमामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करताना जावेद अहमद यांच्यासारख्या जवानांमुळेच देश सुरक्षित आहे. त्यांच्या शौर्याचा सन्मान करणे ही केवळ औपचारिकता नसून आपली नैतिक जबाबदारी आहे. प्रशासन त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभे राहील आणि आवश्यक ती मदत करेल, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नमूद केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा सैनिक अधिकारी निलेश पाटील, सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी संजय गायकवाड, तसेच सैनिकी विभागाचे कल्याण संघटक विश्वनाथ उगले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
