जळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगारीचे जाळेही दिवसेंदिवस विस्तारत असून, सामान्य नागरिकांपासून व्यावसायिक आणि नोकरदारांपर्यंत अनेक जण ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरत आहेत. जळगाव जिल्ह्यातील सायबर फसवणुकीची तीन वर्षांतील आकडेवारी या धोक्याची गंभीरता अधोरेखित करणारी आहे. सन २०२४ ते २०२६ या कालावधीत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात एकूण १५५ गुन्हे दाखल झाले असून तब्बल १० हजार ४३ तक्रारी नोंदविण्यात आल्यानंतर सुमारे ३४ कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या प्रकारांचा विचार करता शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली होणारी फसवणूक सर्वाधिक असल्याचे दिसून येते. कमी कालावधीत मोठा आर्थिक परतावा, शेअर बाजारातील हमखास नफा आणि विशेष गुंतवणूक योजनांचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढले जात आहे. या प्रकारात सन २०२४ मध्ये ३०, सन २०२५ मध्ये १७, तर सन २०२६ मध्ये ९ गुन्हे दाखल झाले. अशा प्रकारचे तीन वर्षांत एकूण ५६ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. बनावट गुंतवणूक ॲप, सोशल मीडियावरील जाहिराती, व्हॉट्सॲप ग्रुप आणि बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो. सुरुवातीला काही रक्कम परतावा म्हणून दाखवून मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते. त्यानंतर पैसे काढण्याच्या वेळी विविध शुल्क आणि करांच्या नावाखाली आणखी रक्कम उकळली जाते.
डिजिटल अटकेच्या नावाखाली दबाव
ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा आणखी एक गंभीर प्रकार म्हणजे डिजिटल अटक. पोलीस, तपास यंत्रणा किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना फोन केला जातो. त्यांच्या नावाने बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे किंवा एखाद्या गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगून अटकेची भीती दाखविली जाते. व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी, बनावट ओळखपत्रे आणि कायदेशीर कारवाईच्या धमक्या देऊन नागरिकांवर मानसिक दबाव निर्माण केला जातो. त्यानंतर तपासाच्या नावाखाली बँक खात्यातील पैसे विशिष्ट खात्यावर पाठविण्यास भाग पाडले जाते. जळगावमध्ये या प्रकाराचे सन २०२४ मध्ये नऊ, सन २०२५ मध्ये सहा आणि सन २०२६ मध्ये चार गुन्हे दाखल झाले आहेत. तीन वर्षांत डिजिटल अटकेचे एकूण १९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
लैंगिक खंडणीचेही प्रकार
सायबर गुन्हेगारांकडून एपीके फाईलच्या माध्यमातून मोबाइलमध्ये घुसखोरी करून वैयक्तिक माहिती, बँक खात्यांचे तपशील आणि ओटीपी मिळविण्याचे प्रकारही समोर आले आहेत. अनोळखी क्रमांकावरून पाठविण्यात आलेल्या फाईल किंवा लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाइलमधील माहितीचा गैरवापर केला जातो. या प्रकारात तीन वर्षांत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय सोशल मीडिया आणि ऑनलाइन माध्यमांचा गैरवापर करून नागरिकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडत आहेत. वैयक्तिक छायाचित्रे किंवा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. अशा लैंगिक खंडणीच्या प्रकारात दोन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याशिवाय अन्य स्वरूपाच्या सायबर फसवणुकीचेही गुन्हे दाखल झाले असून, सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येणाऱ्या पद्धतींमध्ये सातत्याने बदल होत असल्याचे चित्र आहे.
तीन वर्षांतील गुन्ह्यांचे स्वरुप असे
जळगाव सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची वर्षनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सन २०२४ मध्ये सर्वाधिक ७७ गुन्हे दाखल झाले. सन २०२५ मध्ये ही संख्या ४३ वर आली, तर सन २०२६ मध्ये आतापर्यंत ३५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अशा प्रकारे तीन वर्षांतील एकूण गुन्ह्यांची संख्या १५५ झाली आहे. शेअर्स ट्रेडिंग फसवणूक, डिजिटल अटक, एपीके फाईलद्वारे फसवणूक आणि ऑनलाइन ब्लॅकमेलिंग यांसारखे प्रकार या गुन्ह्यांमध्ये समाविष्ट आहेत.
तक्रारींची संख्याही मोठी
सायबर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष दाखल होणाऱ्या गुन्ह्यांबरोबरच केंद्र सरकारच्या ऑनलाइन नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्याही मोठी आहे. सन २०२४ मध्ये या पोर्टलवर ५२१ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. या तक्रारींमधून १६ कोटी ३९ लाख २१ हजार ४८ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. या वर्षात पोलिसांनी ११ कोटी १ लाख ६५ हजार ५६६ रुपये गोठविल्याची आकडेवारी देण्यात आली आहे. सन २०२५ मध्ये ऑनलाइन तक्रारींच्या संख्येत मोठी वाढ झाली. या वर्षात तब्बल ४ हजार ७२९ तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये १० कोटी ३३ लाख ५८ हजार १५१ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली. पोलिसांनी १६ कोटी ३० लाख ८२ हजार १६६ रुपयांची रक्कम गोठविल्याची नोंद आहे. सन २०२६ मध्येही सायबर फसवणुकीचे प्रकार सुरुच असून, या वर्षात ४ हजार ७९३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातून ७ कोटी १९ लाख २ हजार २२४ रुपयांची फसवणूक झाली. तर पोलिसांनी १ कोटी ८९ लाख ६० हजार २२५ रुपये गोठविले आहेत.
