जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (विकास) पशुपालकांच्या हिताचा विचार करून गेल्या काही दिवसांपासून गायीच्या दुधाचे खरेदी दर वाढवले नव्हते. मात्र, दुधाच्या विक्री दरात आठवडाभरापूर्वी अचानक वाढ करून संघाने ग्राहकांना चांगलाच दणका दिला. या पार्श्वभूमीवर, नाराजीचा सूर उमटू लागताच संघाकडून सोमवारपासून गायीच्या दुधाचे खरेदी दर वाढविण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडे दररोज सुमारे २ लाख ८० हजार लिटर दूध संकलन होते. मात्र, यंदा दैनंदिन संकलन घटून सुमारे २ लाख ४६ हजार लिटरपर्यंत खाली आले आहे. सध्या संघाकडे गायीचे अंदाजे १ लाख ४६ हजार लिटर, तर म्हशीचे सुमारे एक लाख लिटर दूध संकलित होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विविध कारणांमुळे दूध पुरवठ्यात घट झाली असून, संघाच्या दैनंदिन दूध संकलनात सुमारे ३५ ते ४० हजार लिटरची घट नोंदवली जात आहे. जिल्ह्यात स्पर्धात्मक दराने दूध खरेदी होत असल्यामुळे दररोज हजारो लिटर दूध गुजरात राज्यात पाठवले जात आहे. तसेच स्थानिक खासगी डेअऱ्यांकडून जळगाव दूध संघाच्या तुलनेत अधिक दर व आगाऊ रक्कम देऊन खरेदी वाढवण्यात येत आहे.

या सर्व बाबींचा थेट परिणाम जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर होत असून, व्यवस्थापनाला मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, जळगाव दूध संघाकडे सध्या जेवढे काही दूध संकलित होत आहे, ते संपूर्णपणे थेट विक्रीसाठीच वापरले जात आहे. परिणामी दूध पावडर व बटर निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त दुधाची व्यवस्था करणे संघासाठी कठीण बनले आहे. दुग्धजन्य पदार्थांसाठी लागणारा साठा उभा करण्याकरीता संघाला मोठी धावपळ व तारेवरची कसरत करावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील पशुपालकांकडून पुरवठा होणाऱ्या गायीच्या दुधासाठी ३.५ फॅट आणि ८.५ टक्के एसएनएफ या गुणवत्तेनुसार २७ ऑगस्टपासून प्रति लिटर ३५ रुपये दर दिला जात आहे. तर म्हशीच्या ६.० फॅट आणि ९.० टक्के एसएनएफ दर्जाच्या दुधाला एक नोव्हेंबरपासून प्रति लिटर ४८.९० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात गेल्या महिन्यात वाढ करण्यात आली असली, तरी गायीच्या दुधाच्या दरात मागील सुमारे तीन महिन्यांपासून कोणतीही वाढ झालेली नाही. याउलट खासगी दूध संघ व डेअऱ्यांकडून तुलनेने अधिक दर दिले जात आहेत. त्यामुळे पशुपालकांचा कल इतर पर्यायांकडे वाढत असून, याच कारणामुळे जळगाव दूध संघाच्या दैनंदिन दूध संकलनात अलीकडे घट झाल्याची चर्चा आहे.

गायीच्या दुधाला आता किती दर ?

मात्र, आता गायीच्या दुधासाठी जळगाव जिल्हा दूध संघाकडून पशुपालक शेतकऱ्यांना प्रति लिटर १.२४ रूपयांची वाढ देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी दूध संघाने घेतला आहे. त्यानुसार, ३.५ फॅट आणि ८.५ टक्के एसएनएफ गुणवत्तेच्या गायीच्या दुधाला ३६.२४ रूपये प्रति लिटर प्रमाणे खरेदी दर जाहीर झाला आहे. नवीन खरेदी दराची अंमलबजावणी सोमवारपासूनच झाली आहे. त्या संदर्भात सूचना जिल्हाभरातील प्राथमिक सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्थांना देण्यात आल्याचे संकलन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.