जळगाव : शहराच्या हवाई संपर्कात मोठी भर घालणारी एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून, दोन मेपासून इंदूरमार्गे जळगाव–दिल्ली नवीन विमानसेवा सुरू होणार आहे. अलायन्स एअर कंपनीच्या माध्यमातून सुरू होणारी ही सेवा जळगावकरांसाठी महत्त्वाची ठरणार असून, देशाची राजधानी दिल्लीशी थेट जोडणी निर्माण होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. दरम्यान, संबंधित विमान कंपनीने तिकीट दर जाहीर केले असून त्यानुसार बुकींग सुरु झाली आहे.

सध्या जळगाव विमानतळावरून मुंबई, पुणे, गोवा, हैदराबाद आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांसाठी नियमित विमानसेवा उपलब्ध आहे. पैकी फ्लाय ९१ या विमान कंपनीमार्फत पुणे, गोवा आणि हैदराबादसाठी सेवा सुरू असून, अलायन्स एअर कंपनीच्या माध्यमातून मुंबई आणि अहमदाबादसाठी उड्डाणे होत आहेत. यामुळे जळगावचा हवाई नकाशावरचा दर्जा गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात उंचावला आहे. या दरम्यान, दिल्लीसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. अखेर त्या प्रयत्नांना यश मिळाले असून, जळगाव ते दिल्ली व्हाया इंदूर ही नवीन विमानसेवा प्रत्यक्षात येत आहे.

एटीआर-४२ प्रकारातील विमानाद्वारे ही सेवा दिली जाणार असून, यामुळे विशेषतः दिल्ली प्रवासाची वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पूर्वी रेल्वे किंवा रस्तेमार्गाने १६ ते १८ तास तास लागायचे. विमानसेवेमुळे दिल्लीचा प्रवास आता साडेतीन ते चार तासांत पूर्ण होऊ शकणार आहे.

असे आहेत विमानाचे तिकीट दर

विमानतळ प्रशासनाला मिळालेल्या वेळापत्रकानुसार, जळगाव ते दिल्ली सेवा सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर १ ते ३१ मे या कालावधीत चालविण्यात येणार आहे. या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार विमानसेवा उपलब्ध असेल. प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतो, याचा आढावा घेऊन पुढील काळात या सेवांची वारंवारता वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

संबंधित विमान कंपनीकडून तिकीट दर जाहीर करण्यात आले असून, बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. ऑनलाइन तसेच अधिकृत माध्यमांद्वारे प्रवासी आपली तिकिटे आरक्षित करू शकत आहेत. जळगाव ते इंदूरसाठी किमान प्रति प्रवासी ३३९५ रुपये इतका तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. तर जळगाव ते थेट दिल्लीसाठी प्रति प्रवासी किमान ६८२१ रुपये इतका तिकीट दर निश्चित केला आहे.

तिरुपतीसाठी देखील विमानसेवा?

इंदूरमार्गे जळगाव ते दिल्ली नव्या सेवेमुळे व्यावसायिक, शासकीय कामकाज तसेच शिक्षण आणि पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. एकूणच, जळगाव विमानतळावरून सुरू होणारी ही दिल्लीकडे जाणारी नवीन विमानसेवा शहराच्या विकासाला चालना देणारी ठरणार असून, उत्तर भारताशी जळगावची जोडणी अधिक मजबूत होणार आहे. आगामी काळात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास जळगाव विमानतळावरून तिरुपतीसाठी सुद्धा नवीन मार्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.