जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात वराड गावाजवळील महामार्गावर बुधवारी सकाळी धावत्या प्रवासी गाडीचे चाक निखळल्याने झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्व अकोला जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
पूजा रवी वागडकर (२२), दत्तू तुळशीराम भागवत (४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (५२, अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर जखमींमध्ये प्रेम भारत वाकडकर (२४), नितेश सुरेश काठोडे (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोडकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत ( ६७) आणि अंश नितेश काठोडे (१४) यांचा समावेश आहे. गुजरातमधील वापी येथे विवाह सोहळा पार पडल्यावर पूजा प्रथमच आपल्या माहेरी अकोल्याकडे नातेवाईकांसह परतत होती. मात्र, या आनंदी प्रवासाला अचानक अपघाताचे ग्रहण लागले. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ त्यांची प्रवासी गाडी वेगात असताना अचानक गाडीचे एक चाक निखळल्याची घटना घडली.
वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. आणि गाडी महामार्गाच्या खाली उतरुन भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून, नववधू पूजासह अन्य दोघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जखमींना त्वरित जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आनंदाच्या क्षणात आलेल्या या दुर्दैवी अपघाताने एका क्षणात लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून अपघाताची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
लाच स्वीकारताना एकाला अटक
दुसऱ्या एका घटनेत जिल्ह्यातील पारोळा येथे आरोग्य विभागाच्या कुटीर रुग्णालयात कार्यरत सहायक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारतानाअटक केली. विजय प्रकाश वाघ (४२), असे दोन हजाराची लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या संशयित लोकसेवकाचे नाव आहे. तक्रारदार हे पारोळा येथील कुटीर रुग्णालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत असून, नोकरीत स्थायी आदेश मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुरू असताना सहाय्यक अधीक्षक विजय वाघ यांच्याकडे त्यांनी त्यासंदर्भात विचारणा केली.
मात्र, वाघ यांनी तक्रारदाराला स्थायी आदेश तयार करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने तत्काळ पैसे देण्यास असमर्थता दर्शवून काही दिवसांनी देण्याचे सांगितले. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने मंगळवारी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता लाच मागणीची तक्रार सत्य असल्याचे निष्पन्न झाले.
