जळगाव : जिल्ह्यातील रेल (ता. धरणगाव) येथे १२ वर्षीय गणेश नवल पाटील या मुलाचा अडीच महिन्यांपूर्वी क्रिक्रेट खेळताना छातीला बॅट लागून संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा मृत्यू केवळ अपघात नसून त्यामागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त करत मृत गणेशचे वडील नवल पाटील यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी गिरणा नदीकाठी पुरलेला गणेशचा मृतदेह उकरुन धुळे येथे त्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या घटनेने धरणगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
रेल गावातील काही मुले सुमारे अडीच महिन्यांपूर्वी गावालगत क्रिकेट खेळत होती. याचवेळी गणेश पाटील याच्या छातीवर जोरात बॅट लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर तो अचानक कोसळला. सुरुवातीला ही घटना अपघात मानण्यात आली होती. गावातही क्रिकेट खेळताना अपघात झाल्याचीच चर्चा होती. मात्र, मुलाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी गणेशचे वडील नवल पाटील यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त करत धक्कादायक आरोप केले.
क्रिकेट खेळताना बॅटचा साधा फटका लागून मुलाचा मृत्यू होणे अशक्यप्राय असल्याचा दावा करत कोणीतरी जाणीवपूर्वक त्याच्या छातीत जोरात बॅट मारली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला. मुलाच्या मृत्यूमागील सत्य बाहेर यावे आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच न्यायालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला.
अखेर महसूल आणि पोलीस प्रशासनाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी रेल गावातील गिरणा नदीकाठी पुरण्यात आलेला गणेशचा मृतदेह उकरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सकाळपासूनच गावात महसूल विभाग, आरोग्य विभाग, न्यायवैद्यक तज्ज्ञ आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. गावातील शेकडो नागरिक या प्रक्रियेचे साक्षीदार होण्यासाठी घटनास्थळी जमा झाले होते.
तहसीलदारांच्या उपस्थितीत आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. अडीच महिन्यांपासून जमिनीत पुरलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी उपस्थित अनेकांच्या अंगावर शहारे आले. एकुलत्या मुलाचा मृतदेह त्या अवस्थेत पाहून गणेशच्या आई-वडिलांना आणि नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले होते.
अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट?
परिसरात काही काळ अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी सतर्कता बाळगली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पुढील तपासणीसाठी तो धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तातडीने पाठविण्यात आला. तेथे न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून सविस्तर उत्तरीय तपासणी करण्यात आली.
सर्व वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पुन्हा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आता उत्तरीय तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालातून गणेशच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून त्याचा मृत्यू नैसर्गिक अपघातामुळे झाला की त्यामागे घातपात होता, याचा उलगडा होणार आहे. अहवालात संशयास्पद बाबी आढळल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
