जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याने शनिवासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कडक उन्हाळ्यामुळे होरपळलेल्या या भागाला गेल्या दोन दिवसांत काहीसा दिलासा मिळाला असला, तरी आता विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि वळवाच्या पावसाचा इशारा देण्यात आल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा दीर्घकाळ ४० अंश सेल्सिअसच्या पुढे राहिल्याने उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई आणि उकाड्यामुळे जनावरे तसेच पिकांनाही मोठा फटका बसला. अशात वातावरणात अचानक बदल होऊन काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने जळगावमधील केळी उत्पादकांना मोठा फटका बसला.
हवामान खात्याने आता पुन्हा एकदा वादळी पावसाचा इशारा दिल्याने चिंता वाढली आहे. विशेषतः केळी, द्राक्ष, डाळिंब आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांची पायाखालची जमीन सरकली आहे. मागील काही महिन्यांत अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागांतील फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. काही शेतकऱ्यांनी मोठ्या आर्थिक अडचणींवर मात करत फळबागा पुन्हा उभ्या करण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच नव्या संकटाची चाहूल लागली आहे. जोरदार वाऱ्यामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीबाबत भारतीय हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. बुधवारी मॉन्सूनने लक्षद्वीप बेटांच्या दक्षिण भागासह नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्रातील काही भाग, बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य, आग्नेय आणि पूर्व-मध्य भाग, अंदमान समुद्राचा उर्वरित परिसर तसेच पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. शुक्रवारी मात्र मॉन्सूनची प्रगती स्थिर राहिली होती. पुढील दोन दिवसांत मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान अनुकूल असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मॉन्सून हंगामाबाबत सुधारित अंदाज जाहीर करत देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९० टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यमानात तुटवडा राहण्याची शक्यता तब्बल ६० टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उलट सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता केवळ २ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विभागनिहाय पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार ईशान्य भारतात सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात ९४ टक्क्यांपेक्षा कमी, तर वायव्य भारतात ९२ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगाम, पाणीसाठे आणि शेती उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
