महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जळगाव जिल्ह्य़ात जानेवारी २०१६ अखेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे १९,५९९ तंटे दाखल झाले असून, त्यापैकी केवळ २०९४ तंटे सामोपचाराच्या माध्यमातून मिटविण्यात आले आहेत. मिटलेल्या तंटय़ांमध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी तंटय़ाचे आहे, तर दिवाणी आठ आणि महसुली स्वरूपाचे केवळ ११ तंटे मिटले आहेत.
गाव पातळीवर तंटे निर्माण होऊ नये म्हणून उपक्रम राबविणे या मोहिमेत अपेक्षित असले तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे तसे अवघडच. यामुळे दाखल असलेले व नव्याने निर्माण होणाऱ्या तंटय़ांचे निराकरण करून ते कमी करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून गावात शांततेचे वातावरण प्रस्थापित करतानाच प्रशासकीय व न्याय व्यवस्थेवरील वाढता भारही कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या मोहिमेंतर्गत स्थावर मालमत्तेचे मालकी हक्क, वारसा हक्क, वाटप, हस्तांतरण, शेतीचे मालकी हक्क, वारसा हक्क, अतिक्रमणे, शेतात जावयाचा रस्ता आदी कारणांवरून निर्माण झालेले तंटे, मालमत्ता व फसवणूक यासंबंधीचे अदखलपात्र व दखलपात्र फौजदारी गुन्ह्य़ांपैकी जे गुन्हे संबंधित पक्षकारांच्या सहमतीने व कायद्यानुसार मिटविता येऊ शकतात, असे तंटे तसेच सहकार, कामगार, औद्योगिक क्षेत्रातील व इतर तंटे सामोपचाराच्या माध्यमातून सोडविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोहिमेच्या आठव्या-नवव्या वर्षांत म्हणजे २०१५-१६ या कालावधीत जळगाव जिल्ह्य़ात आतापर्यंत दिवाणी स्वरूपाचे ५९७५, महसुली ७३५, फौजदारी १२४७५ आणि इतर ४१४ असे एकूण १९,५९९ तंटे दाखल झाले आहेत. या मोहिमेंतर्गत त्यातील दिवाणी आठ, महसुली ११, फौजदारी २०३५ आणि इतर ४० असे एकूण २०९४ मिटविण्यात यश मिळाले. तंटे मिटण्याची टक्केवारी केवळ १०.६८ टक्के असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने म्हटले आहे. तंटामुक्त गाव समिती तंटे मिटविण्याच्या कामात मध्यस्त व प्रेरकाची भूमिका बजावते. यंदाच्या वर्षांचा आढावा घेतल्यास समित्यांनी फौजदारी तंटय़ांप्रमाणेच दिवाणी, महसुली व इतर तंटे सोडविण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.