जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या इंधन पुरवठा अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅस सिलिंडर वितरणाबाबत अधिक कठोर धोरण अवलंबले आहे. भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), इंडियन ऑइल (आयओसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या स्थानिक अधिकाऱ्यांना लेखी सूचना पाठविण्यात आल्या आहेत.

मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. याचा संभाव्य परिणाम देशांतर्गत पुरवठ्यावर होऊ शकतो, या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी ग्राहकांकडून ‘पॅनिक बुकिंग’ वाढण्याची तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा अनावश्यक साठा करण्याचे प्रकार घडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, काही गॅस एजन्सींकडून नियमांचे उल्लंघन करून कार्यालय किंवा गोदामातून थेट सिलिंडरचे वितरण केले जात आहे. या प्रकारामुळे एजन्सीच्या परिसरात ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, त्यातून सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. आग किंवा इतर अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय अधिक कडकपणे लागू करण्याचे ठरवले आहे. गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांनी केवळ घरपोच पद्धतीनेच सिलिंडरचे वितरण करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, कार्यालय किंवा गोदामातून थेट वितरण केल्यास संबंधित एजन्सींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे यांनी दिला आहे.

घरपोंच सिंलिंडर निर्णयाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व गॅस एजन्सींना या आदेशाचे तात्काळ पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रतीक्षा यादीत फेरफार होऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार टाळले जावेत यासाठी सर्व व्यवहार नोंदवहीत व ऑनलाइन प्रणालीत स्पष्टपणे नोंदविणे आवश्यक करण्यात आले आहे. ग्राहकांना वेळेवर व नियमानुसार सेवा मिळावी, यासाठी एजन्सींनी वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गॅस एजन्सीवर ही कारवाई

आदेशाचे पालन न करणाऱ्या गॅस एजन्सींवर परवाना निलंबन, दंडात्मक कारवाई किंवा इतर कायदेशीर पावले उचलण्यात येतील. यासाठी विशेष पथके नियुक्त करून तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा साठा पुरेसा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच घाबरून अनावश्यक बुकिंग किंवा साठेबाजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

एजन्सी किंवा गोदामांवर गर्दी टाळून घरपोच सेवेला सहकार्य करावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. एका स्थानिक गॅस वितरकाने सांगितले की, सध्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. ग्राहकांनी संयम बाळगावा. प्रत्येकाला वेळेत सिलिंडर मिळेल. अनावश्यक घाई किंवा गर्दी केल्यासच समस्या निर्माण होतात.