जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. शनिवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. खडसे यांनी गुलाबराव देवकर हे राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला तीन वर्षे, तर शिवसेनेला दोन वर्षे असा अध्यक्षपदासाठीचा तोडगा ठरविण्यात आला होता. प्रत्येकी एक वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन व्यक्तीला अध्यक्षपद दिले जाईल, असा निर्णय झाला होता. त्याअनुषंगाने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला असल्याची माहिती गुलाबराव देवकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवकर म्हणाले की, सुरुवातीला माझ्या राजीनामा देण्यास कार्यकर्त्यांमध्ये कमालीची तीव्र भावना होती. मी अगोदर सोमवारी राजीनामा देणार होतो. मात्र, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन, सोमवारी मी प्रचारावेळी सहकार्य केलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चाही केली. त्यानंतर निर्णय घेत आणि ठरलेल्या निर्णयानुसार मंगळवारी सकाळी राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांविषयी देवकर म्हणाले की, माझ्या काळात संचित तोटा व एनपीए कमी करण्याबाबत मोठे निर्णय घेतले. बँकेचे हित पाहिले. माझ्या एक वर्ष कार्यकाळात चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न राहिला. बँकेला ९७ कोटींचा संचित तोटा आहे. तसेच २०२० पर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत एनपीए होता. याचे आव्हान आमच्यासमोर होते. ते आव्हान समोर ठेवून आम्ही कामाला लागतो. संचालक मंडळाच्या सहकार्याने आम्ही कामाला सुरुवात केली. त्यात प्रामुख्याने जे. टी. महाजन सूतगिरणी विक्रीसाठी अनेकदा निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, सूतगिरणी विक्री केली जात नव्हती. माझ्या कार्यकाळात ती विक्री करण्यात आली. ऑनलाइन निविदा काढून ती विक्री झाली. त्यातून बँकेचे सुमारे साडेसात कोटी रुपये वसूल झाले. त्याच पद्धतीने मधुकर सहकारी साखर कारखानाही तीन ते चार वर्षांपासून बंद होता. तोही विक्री करण्याचा आम्ही घेतला. त्याचीही विक्रीही झाली आहे. विक्रीपोटी आतापर्यंत पंचवीस टक्के रक्कम भरण्यात आली आहे. अजून ७५ टक्के रक्कम नऊ फेब्रुवारीपर्यंत ते भरणार आहेत. ती सुमारे ६३ कोटींची रक्कम बँकेच्या नफ्यामध्ये जमा होणार आहे. अर्थात ६३ कोटी आणि साडेसात कोटी असे सुमारे साडेसत्तर कोटी रुपये बँकेच्या नफ्यामध्ये अर्थात संचित तोट्यात जमा होतील.

हेही वाचा – कायद्यानुसार सत्यजित तांबे यांना अपक्षच राहावे लागणार

हेही वाचा – नाशिक : आचारसंहितेचे सावट हटल्यानंतर निधी खर्चाची कसरत

आता बँकेच्या संचित तोट्यात फक्त सत्तावीस कोटी शिल्लक राहतील. मात्र, येत्या मार्चपर्यंत हा संचित तोटा भरून निघण्याचा माझा अंदाज आहे. संचालक मंडळाच्या सहकार्याने ही मोठी कामे माझ्या कार्यकाळात झाली आहेत. त्याच पद्धतीने वसंत सहकारी साखर कारखानासुद्धा विक्रीचा निर्णय आम्ही घेत आहोत. ज्या काही न्यायालयीन बाबी आहेत, त्या काही बाबीची पूर्तताही आम्ही केली आहे. अजूनही काही थोड्या त्रुटी राहिल्या आहेत, त्याबाबत कार्यवाही केली जात आहे. हा वसंत कारखानाही विकला जाणार आहे. कारखाना विकल्यानंतर चाळीस ते पन्नास कोटी बँकेच्या संचित तोट्यात जमा होतील. या कामांतून बँकेचा संचित तोटा भरून निघू शकतो. मागील वर्षात बँकेचा एनपीए पन्नास टक्क्यांवरून ४५ टक्क्यांवर आणला होता. अजूनही हा कारखाना विकल्यानंतर पाच ते सात टक्क्यांनी एनपीए कमी होऊ शकतो. या माध्यमातून बँकेचा एनपीए व संचित तोटाही कमी होतो आहे. सध्या बँक ब वर्गामध्ये आहे, ती अ वर्गामध्ये येण्यासाठी हे सर्व कामे आम्ही केली. त्याचा फायदाही होणार आहे, असेही देवकर यांनी सांगितले.

More Stories onजळगावJalgaon
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon district bank chairman deokar resignation ssb
First published on: 07-02-2023 at 14:51 IST