जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदारसंघातील १५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीतील अनेक बड्या नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना, विशेषतः पत्नींना, रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणातील शक्तिप्रदर्शनाची निवडणूक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वतः केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन स्वतः तसेच त्यांच्या पत्नी जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे स्वतः तसेच यांच्या पत्नी रजनी सावकारे, अमळनेरचे आमदार अनिल पाटील स्वतः तसेच यांच्या पत्नी जयश्री पाटील, एरंडोल-पारोळ्याचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी नलिनी पाटील , जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष तथा आमदार अमोल पाटील स्वतः तसेच यांच्या पत्नी मृणाल पाटील यांच्या नावाचे ठराव दाखल करण्यासाठी मोठी चढाओढ सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय दूध संघाचे चेअरमन तथा आमदार मंगेश चव्हाण आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचेही ठराव प्रथमच प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या सर्व दिग्गजांच्या गटांकडून प्रत्यक्ष उमेदवारीची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
पालकमंत्र्यांच्या घरातूनही ठराव?
इतर दिग्गजांप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबातूनही जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. प्रमुख नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना पुढे केल्याने प्रत्येक तालुक्यातील राजकीय समीकरणांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातील सोसायटी मतदारसंघाच्या १५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्येक तालुक्यातून एक संचालक निवडला जाणार असल्याने तालुकानिहाय सहकार क्षेत्रातील समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. कोणत्या तालुक्यात कोणत्या गटाचे वर्चस्व आहे, कोणत्या सोसायट्यांनी कोणाला मतदानासाठी प्राधिकृत केले आहे आणि प्रमुख नेत्यांची ताकद किती आहे, यावर निवडणुकीतील गणित अवलंबून राहणार आहे.
ठरावासाठी २ सप्टेंबरपर्यंतची मुदत
सोसायटी मतदारसंघातील ठराव सादर करण्याच्या प्रक्रियेला सध्या वेग आला आहे. जिल्ह्यातील एकूण ८७६ सोसायट्यांकडून मतदानासाठी प्राधिकृत सदस्याचे ठराव मागविण्यात आले आहेत. शुक्रवारपर्यंत यापैकी २६० सोसायट्यांचे ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त ठराव पुढील पडताळणीसाठी विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. उर्वरित ६१६ सोसायट्यांना ठराव सादर करण्यासाठी २ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ठराव दाखल करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने संबंधित सोसायट्यांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपल्या सोसायटीच्या वतीने कोणत्या सदस्याला मतदानासाठी प्राधिकृत करायचे, यावरून गावपातळीवर बैठका आणि राजकीय खलबते सुरू आहेत. अनेक ठिकाणी संबंधित सदस्याच्या निवडीवरून स्थानिक पातळीवर चर्चा रंगत असून या प्रक्रियेमुळे सहकार क्षेत्रातील अंतर्गत राजकारणही चांगलेच तापले आहे.
नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांचा वाढता सहभाग पाहता ही निवडणूक आगामी काळातील जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाची मानली जात आहे. महायुतीतील विविध नेत्यांनी आपापल्या समर्थकांना आणि कुटुंबीयांना मैदानात उतरविण्याची तयारी केल्याने तालुकानिहाय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. आता उर्वरित सोसायट्यांचे ठराव दाखल झाल्यानंतर कोणत्या तालुक्यात कोणता गट किती ताकदीने मैदानात उतरणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
