जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी नामंजूर केला. सलग दहा वर्षे संचालकपद भूषविल्याने सहकार कायद्यातील तरतुदीनुसार ते निवडणूक लढविण्यास अपात्र ठरल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. आमदार पाटील यांच्यासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे.

दुसरीकडे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार, त्यांचे कुटुंबीय, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्यासह आठ उमेदवारांच्या अर्जांवर हरकती दाखल झाल्याने निवडणुकीतील वातावरण चांगलेच तापले आहे. धरणगाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार, त्यांच्या पत्नी सोनल पवार आणि पुत्र संग्रामराजे पवार यांच्या अर्जांवर गायत्री भगवान पाटील यांनी हरकत घेतली आहे.

रक्षा खडसे यांच्या अर्जावरही हरकत

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर आनंदराव देशमुख यांनी हरकत घेतली आहे. खडसे या बँकेच्या थकबाकीदार असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदविला आहे. दुसरीकडे, देवयानी देशमुख आणि विनोद पाटील यांच्या उमेदवारी अर्जांवर रक्षा खडसे यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या अर्जांबाबतचा निर्णयही महत्त्वाचा ठरणार आहे.

सुमित पाटील यांच्या सभासदत्वावर प्रश्नचिन्ह

पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर सतीश शिंदे यांनी हरकत घेतली आहे. सुमित पाटील हे गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा बँकेचे सभासद नसून त्यांना आवश्यक अनुभवही नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची वैधता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे.

आणखी दोन अर्जांवर हरकत

दरम्यान, पंढरीनाथ चंपालाल पाटील आणि वैशाली पंढरीनाथ पाटील हे जिल्हा सहकारी बँकेचे थकबाकीदार असल्याची हरकत घेण्यात आली आहे. या आक्षेपांसह अन्य उमेदवारांच्या अर्जांवरील हरकतींवर निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांच्यासमोर सुनावणी झाली.

मंगळवारी हरकतींवर निकाल

अर्ज छाननीदरम्यान दाखल झालेल्या हरकतींवरील सुनावणी सोमवारी उशिरापर्यंत सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी मंगळवारी हरकतींवर निर्णय देणार असून त्यानंतर संबंधित उमेदवारांचे अर्ज वैध की अवैध हे स्पष्ट होईल. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट मिळून तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात नेमकी लढत कशी रंगणार, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रमुख राजकीय नेत्यांच्या उमेदवारी अर्जांवरच हरकती घेण्यात आल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.