जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या चार दिवसांत इच्छुकांनी मोठी गर्दी केली असून आमदारांसह त्यांच्या निकटवर्तीयांनीही रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे बँकेच्या सत्तेची लढाई अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. आता शेवटच्या दिवशी कोणते राजकीय दिग्गज मैदानात उतरतात आणि महायुतीचे गणित नेमके कसे जुळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उमेदवारीच्या चर्चेने उत्सुकता वाढवली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी अंतिम दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन हे स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास जिल्हा बँकेची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची ठरणार आहे. आतापर्यंत महायुतीचे आमदार आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच नव्याने सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी दाखल होणाऱ्या अर्जांकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असेल.

भाजपसह मित्रपक्षांत जागा वाटपाचा तिढा

जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांसाठी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, जागावाटपाच्या चर्चेत भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवायची झाल्यास एकूण २१ जागांपैकी भाजपने तब्बल १३ जागांवर दावा केल्याची माहिती आहे. या प्रस्तावानुसार शिवसेना (शिंदे गट) यांना पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना तीन जागा देण्याचे गणित मांडण्यात आले आहे. मात्र, भाजपच्या या जागावाटपाच्या सूत्रावर शिंदे गट समाधानी नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील राजकीय ताकद आणि संघटनात्मक प्रभाव लक्षात घेता अधिक जागांची अपेक्षा असल्याने शिंदे गटाकडून या प्रस्तावाला अनुकूल प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे.

भाजपचा दुहेरी डाव असल्याची चर्चा

महायुतीतील जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नसल्याने राजकीय संभ्रम कायम आहे. मित्रपक्षांना चर्चेत गुंतवून ठेवायचे, जागावाटपाचा तिढा शेवटपर्यंत कायम ठेवायचा आणि ऐनवेळी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर करायची, अशी रणनीती भाजपकडून आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, याबाबत कोणत्याही पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे महायुती प्रत्यक्षात एकत्र निवडणूक लढवणार की जागावाटपाच्या मुद्द्यावरून स्वतंत्र वाट धरली जाणार, हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व

जिल्हा बँकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १० जागा जिंकत वर्चस्व निर्माण केले होते. शिवसेनेला पाच, काँग्रेसला तीन, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. भाजपकडून संजय सावकारे हे एकमेव उमेदवार विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतर जिल्हा बँकेतील संचालकांचे पक्षीय बलाबलही बदलले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीतील निकाल आणि सध्याची राजकीय परिस्थिती यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.

गिरीश महाजनांच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव असलेले गिरीश महाजन स्वतः जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास भाजपच्या रणनीतीला वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांनाही नवे वळण मिळू शकते. दुसरीकडे गुलाबराव पाटील यांची भूमिका आणि शिंदे गटाची नाराजी यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणेही चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत. एकीकडे जागावाटपाचा तिढा, दुसरीकडे दिग्गजांच्या उमेदवारीची चर्चा आणि तिसरीकडे पक्षांतरानंतर बदललेले राजकीय बलाबल, अशा तिहेरी कोंडीत जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक अडकली आहे. त्यामुळे अंतिम दिवशी कोण अर्ज दाखल करणार, महायुतीचे जागावाटप जुळणार की स्वतंत्र लढतीचे चित्र निर्माण होणार, यावरच पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.