जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यंदा विशेषतः धरणगाव तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. सलग दहा वर्षे संचालक राहिल्याच्या कारणावरून मावळते अध्यक्ष संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. मात्र, या संभाव्य अडचणीचा अंदाज असल्याने त्यांनी पत्नी सोनल पवार आणि मुलगा संग्रामराजे पवार या दोघांचेही उमेदवारी अर्ज आधीच दाखल केले होते. छाननीअंती दोन्ही अर्ज वैध ठरल्याने पवार कुटुंबाने आपली दावेदारी कायम ठेवली आहे.

जिल्हा बँकेचे मावळते अध्यक्ष संजय पवार यांचा स्वतःचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातून नेमके कोण निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. माघारीच्या प्रक्रियेत पत्नी सोनल पवार किंवा मुलगा संग्रामराजे यांपैकी एकाच उमेदवाराचा अर्ज कायम ठेवण्याच्या दृष्टीने पवार यांनी विचार केल्याचे समजते. त्यामुळे माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत या मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पवार कुटुंबाची रणनीती सुरू असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनीही याच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्याचप्रमाणे गायत्री भगवान पाटील यांचाही उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील या मतदारसंघातील निवडणुकीची चुरस वाढली आहे. प्रताप पाटील यांची उमेदवारी संजय पवार यांच्या कुटुंबासाठी मोठे आव्हान मानले जात आहे. पालकमंत्र्यांच्या राजकीय प्रभावाचा आणि स्थानिक सहकार क्षेत्रातील समीकरणांचा प्रताप पाटील यांना कितपत फायदा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, संजय पवार यांचा जिल्हा बँकेतील दीर्घकालीन अनुभव, सहकार क्षेत्रातील संपर्क आणि स्थानिक पातळीवरील राजकीय ताकद यांच्या जोरावर पवार कुटुंब या लढतीत आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चित्र आहे.

सलोख्याच्या संबंधांना निवडणुकीचे ग्रहण?

संजय पवार आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पूर्वीपासून सलोख्याचे संबंध राहिले आहेत. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही कुटुंबांतील उमेदवारी एकाच मतदारसंघातून पुढे आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. उमेदवारीच्या या स्पर्धेमुळे दोघांमधील संबंधांत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संजय पवार यांनी धरणगाव तालुक्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधकांशी जवळीक वाढविण्यावर भर दिल्याचे बोलले जात आहे. स्थानिक राजकीय गट, सहकारी संस्थांमधील मतदारांचे पाठबळ आणि विविध नेत्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील न राहता स्थानिक राजकीय शक्तिप्रदर्शनाचीही ठरू शकते.

माघारीनंतर राजकीय चित्र स्पष्ट होणार

जिल्हा बँकेची निवडणूक ही सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते. बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळविण्यासाठी विविध राजकीय गटांनी आपापल्या पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. धरणगाव मतदारसंघात पवार कुटुंबातून कोण उमेदवार कायम राहतो, प्रताप पाटील आपली उमेदवारी कायम ठेवतात का आणि इतर उमेदवार माघार घेतात का, यावर या लढतीचे स्वरूप अवलंबून राहणार आहे. विशेष म्हणजे, संजय पवार यांचा स्वतःचा अर्ज बाद झाल्यानंतरही त्यांनी कुटुंबातील दोन उमेदवारांचे अर्ज दाखल करून निवडणुकीतील आपली उपस्थिती कायम ठेवली आहे. दुसरीकडे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठीही पुत्र प्रताप पाटील यांची उमेदवारी प्रतिष्ठेचा विषय ठरू शकते. त्यामुळे माघारीच्या टप्प्यात पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, धरणगाव तालुक्यातील या मतदारसंघात अखेर कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.