जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिग्गज नेते आणि लोकप्रतिनिधींनी सहकार क्षेत्रातील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी कंबर कसली असतानाच उमेदवारी अर्जांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, दोन मंत्र्यांसह तीन आमदारांना बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग सोपा राहिलेला नाही. विविध तालुक्यांमध्ये विरोधी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा सहकारी संस्था आणि संयुक्त शेती संस्था यांच्या प्रतिनिधींच्या मतदारसंघात प्रत्येक तालुक्यातून एक प्रतिनिधी निवडला जाणार आहे. या मतदारसंघातील उमेदवारी अर्जांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे चर्चेत आली आहेत. राजकीय ताकद, स्थानिक गटबाजी आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.
गिरीश महाजन यांच्यासमोर आव्हान
जामनेर तालुक्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महाजन यांचे मोठे वजन असून, सहकार क्षेत्रातही आपले स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, त्यांच्या विरोधात तुकाराम विठोबा निकम यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाजन यांची बिनविरोध निवड होण्याच्या शक्यतेला तूर्तास अडथळा निर्माण झाला आहे. निकम यांचा अर्ज कायम राहतो की माघारीच्या प्रक्रियेत ते माघार घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गुलाबराव पाटलांसमोर तिहेरी आव्हान
जळगाव तालुक्यातून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंदा प्रथमच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या विरोधात एक-दोन नव्हे, तर तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. माजी महापौर जयश्री महाजन, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील आणि प्रभाकर सोनवणे यांनी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांसमोर राजकीय आणि स्थानिक पातळीवरील आव्हान उभे राहिले आहे. या उमेदवारांपैकी किती जण निवडणुकीच्या रिंगणात कायम राहतात, यावर पुढील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
आमदार अनिल पाटील यांनाही विरोध
अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांचा स्वतःचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. मात्र, त्यांची पत्नी जयश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात प्रफुल्ल हिरालाल पवार यांनी अर्ज दाखल करून निवडणुकीत आव्हान निर्माण केले आहे. अमळनेरमध्ये या निवडणुकीकडे आमदार अनिल पाटील यांच्या राजकीय प्रभावाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. पत्नीच्या उमेदवारीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न असताना विरोधी अर्जामुळे बिनविरोध निवडीची शक्यता अनिश्चित झाली आहे.
मंगेश चव्हाण विरोधात पाच उमेदवार
चाळीसगाव तालुक्यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात तब्बल पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. विरोधी उमेदवारांमध्ये प्रदीप रामराव देशमुख यांच्यासारख्या तुल्यबळ मानल्या जाणाऱ्या उमेदवाराचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात या लढतीची विशेष चर्चा सुरू झाली आहे. आमदार चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक केवळ सहकारी बँकेतील प्रतिनिधित्वाची नसून तालुक्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची संधी मानली जात आहे. पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीतील समीकरणे कोणत्या दिशेने वळतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
नंदकिशोर महाजन विरोधात आठ अर्ज
रावेर तालुक्यात आमदार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर सर्वाधिक चुरशीचे आव्हान उभे राहिले आहे. त्यांच्या विरोधात तब्बल आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी अर्जांची संख्या लक्षवेधी ठरली आहे. आठ प्रतिस्पर्ध्यांच्या अर्जांमुळे आमदार महाजन यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता कठीण बनली आहे. अर्ज माघारीच्या टप्प्यात कोण कोणाला पाठिंबा देतो, कोण माघार घेतो आणि कोण निवडणुकीच्या मैदानात कायम राहतो, यावर रावेरमधील लढतीचे अंतिम स्वरूप ठरणार आहे.
माघारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांमुळे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मंत्री, आमदार आणि त्यांच्या समर्थक उमेदवारांसमोर वेगवेगळ्या तालुक्यांतून प्रतिस्पर्धी उभे ठाकल्याने बिनविरोध निवडीचे गणित सध्या तरी अवघड दिसत आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल होणे आणि प्रत्यक्ष निवडणूक लढविणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. अर्जांची छाननी, वैध उमेदवारांची अंतिम यादी आणि त्यानंतरची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या काळात राजकीय नेत्यांकडून मनधरणी, चर्चासत्रे आणि स्थानिक पातळीवरील तडजोडींचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्चस्वासाठी प्रतिष्ठेची लढाई
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची आर्थिक संस्था आहे. त्यामुळे या बँकेतील प्रतिनिधित्व आणि सत्तेवर प्रभाव राखणे हे राजकीय पक्षांसह स्थानिक नेत्यांसाठीही महत्त्वाचे मानले जाते. ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी आणि सहकारी संस्थांशी संबंधित व्यवहारांमध्ये जिल्हा बँकेची भूमिका निर्णायक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता माघारीच्या प्रक्रियेत कोणते राजकीय डावपेच खेळले जातात, कोणाची मनधरणी यशस्वी होते आणि कोण प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सहकार क्षेत्रातील वर्चस्वाची ही लढाई आगामी जिल्हा राजकारणाची दिशा ठरविणारी ठरणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
