जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने आता वेग घेतला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या तीन दिवसांत २१ जागांसाठी तब्बल ५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने शेवटच्या टप्प्यात उमेदवारी अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा असल्याने त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची संभाव्य उमेदवारी. पाटील हे गुरुवारी दिवसभरात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांना कोणते वळण मिळते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पालकमंत्री स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह वाढण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील इतर राजकीय गटांच्या रणनीतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, त्यांच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा आणि अर्ज दाखल झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
आजी-माजी मंत्री पूत्रांमुळे चुरस
जिल्हा बँक निवडणुकीसाठी सुरुवातीच्या दोन दिवसांत ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तिसऱ्या दिवशी बुधवारी आणखी ४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ज्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पूत्र प्रताप पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पूत्र विशाल देवकर यांच्या अर्जांचा समावेश होता. दरम्यान, बुधवारी तालुकानिहाय विकास संस्था मतदारसंघात चोपडा तालुक्यातून रोहित दिलीप निकम, घनश्याम ओंकारलाल अग्रवाल आणि निलम शशिकांत पाटील यांनी अर्ज भरले आहेत. रावेर तालुक्यातून राजेश गजानन वानखेडे आणि मंदार मनोहर पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. धरणगाव तालुक्यातून प्रताप गुलाबराव पाटील, भडगाव तालुक्यातून प्रताप हरी पाटील, पूनम प्रशांत पाटील, बोदवड तालुक्यातून मधुकर रामचंद्र राणे आणि रुपेश दामोदर गांधी यांनी अर्ज दाखल केले.
यांचेही उमेदवारी अर्ज दाखल
विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातून विजय रामदास पाटील, सुरेश पुना धनके, सदाशिव गणपतराव ढेकळे आणि प्रकाश देशमुख जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून निलेश सुरेश चौधरी, विष्णू महादू सोनार, राजेश दत्तू पाटील, गोपाळ रामकृष्ण भंगाळे, वसंतराव शिवदास भोलाणे, अशोक आधार पाटील, रविंद्र पुंडलिक पाटील आणि प्रताप हरी पाटील यांनी अर्ज दाखल केले. इतर सहकारी संस्था मतदारसंघातून गोपाळ रामकृष्ण भंगाळे, निलेश सुरेश चौधरी, विशाल गुलाबराव देवकर, वसंतराव शिवदास भोलाणे, सुदाम शेणपडू पाटील, प्रताप हरी पाटील आणि पूनम प्रशांत पाटील यांनी अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून महेंद्र बळीराम सपकाळे आणि शामकांत बळीराम सोनवणे यांचे अर्ज दाखल झाले. महिला प्रतिनिधी प्रवर्गातून लिलाबाई सुरेश चौधरी, सारिका गोपाळ भंगाळे, निलम शशिकांत पाटील, ज्योती रविंद्र पाटील, योगिता अशोक पाटील आणि पूनम प्रशांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
