जळगाव : शहरातील जिल्हा कारागृहात कैद्याची हत्या करण्यात आली असून, भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र खरात यांच्या हत्याकांडातील सध्या कारागृहात असलेल्या संशयितांमध्ये अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोहसीन असगर खान (३४) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपब्लिकन पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र खरात (५५) यांची सात ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळमध्ये क्रूर पद्धतीने हत्या झाली होती. एका टोळक्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात रवींद्र यांच्यासह पाच जणांचे बळी गेल्याने परिसर हादरला होता. पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील संशयित सध्या जळगावच्या कारागृहात आहेत. हेही वाचा.नाशिक : मालमत्ता करात पुनर्पडताळणीनंतर बदल करा, नगरविकास विभागाचे नाशिक महापालिकेला निर्देश या प्रकरणातील संशयित मोहसीन असगर खान याचा दुसर्या संशयिताशी नऊ जुलै रोजी दुपारी वाद झाला. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. याअनुषंगाने मध्यरात्री दीडच्या सुमारास दुसर्या संशयिताने मोहसीनवर हल्ला चढविला. त्यात मोहसीन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकार्यांनी कारागृहाकडे धाव घेऊन संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. हेही वाचा.नाशिक शहरातील दोन मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा दरम्यान, जळगाव जिल्ह्यात काही महिन्यांपासून हत्यांच्या घटना घडत असताना बुधवारी पहाटे जळगाव जिल्हा कारागृहातील संशयिताच्या हत्येचे प्रकरण घडल्याने जिल्हा हादरला आहे. यापूर्वीही जिल्हा कारागृह अनेक गैरकृत्यांमुळे चर्चेत होते. आता कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, कर्तव्यात कसूर करणार्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत. या घटनेमुळे भुसावळमधील टोळीयुद्ध आता कारागृहातही पोहोचल्याची चर्चा सुरू आहे.