जळगाव – जिल्ह्यातील रावेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना यापूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नसताना, रविवारी सायंकाळी पुन्हा वादळी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे सुमारे ३४२ हेक्टरवरील केळीच्या बागा भूईसपाट होऊन ६८६ शेतकरी बाधित झाले. हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला गेल्याने संबंधित सर्व शेतकरी रडकुंडीस आले आहेत.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रावेर तालुक्यात उन्हाळ्याच्या शेवटी दरवर्षी गारपिटीसह वादळी पावसाचा मोठा फटका बसतो. यंदाही एप्रिल महिन्यात वादळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ४५१ हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान होऊन ६४९ शेतकरी बाधीत झाले होते. मे महिन्यातही ५१९ हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले होते. पावसाळा सुरू झाल्यानंतरही वादळी पावसाने रावेर तालुक्यास तडाखा देणे सुरूच ठेवले.
जून महिन्यात पहिल्या टप्प्यात ३१.८ हेक्टरवरील बागांचे नुकसान झाले असतानाच रविवारी सायंकाळी पुन्हा चिनावल, वाघोदा, निंभोरा, वडगाव, उटखेडा, विवरे गावांच्या परिसरातील ३४२ हेक्टरवरील नवती केळीच्या बागांची मोठी हानी झाली. आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यातून वाचलेला केळीच्या बागा क्षणात भूईसपाट झाल्याचे पाहुन संबंधित शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आले. कृषी विभागाकडून नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केल्यानंतर आता प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरूवात केली जाणार आहे.
उन्हाळ्यातील अति तापमानामुळे केळीच्या बागांची होरपळ वाढल्याने रावेर तालुक्यातील शेतकरी आधीच हैराण झाले होते. त्यात एप्रिलसह मे आणि जून महिन्यात झालेल्या गारपिटीसह वादळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान केळीच्या बागांचे झाले. केळीबागा जगविण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांना परिणामी लाखो रुपयांचा फटका सोसावा लागला. एप्रिलसह मे आणि जून महिन्यातील यापूर्वीच्या पीक नुकसानीचे पंचनाम्यांचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात शासनाकडून अद्याप कोणतीच आर्थिक मदत मिळालेली नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी केळी उत्पादकांनी केली आहे.