जळगाव : शहरातील महापालिकेच्या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. त्यापैकी प्रभाग पाच (अ) मधील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. येथे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. मात्र, या विजयाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने रात्री तुफान दगडफेक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
मतमोजणीनंतर शुक्रवारी रात्री उशिरा विष्णू भंगाळे यांच्या अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची चालकाने तक्रार दिल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा अधिक तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करताना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी अशा प्रकारच्या घटना थांबल्या नाहीत आणि संशयितांवर पोलिसांकडून कठोर कारवाई न झाल्यास आम्हालाही कडक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा दिला आहे.
महापालिका निवडणुकीत प्रभाग पाच (अ) मध्ये अपक्ष उमेदवार पीयूष पाटील यांची थेट लढत यंदा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याशी झाली. दरम्यान, आर. आर. विद्यालयातील मतदान केंद्रावर गुरूवारी रांगेतील काही मतदारांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर अपक्ष उमेदवार पाटील यांनी त्याबद्दल तक्रार केली. प्रसंगी एका मतदाराला त्यांनी कमरेत लाथ घालून बाहेर काढले. काही वेळाने शिंदे गटाचे उमेदवार भंगाळे हे स्वतः मतदान केंद्रावर पोहोचल्यावर दोन्ही उमेदवारांमध्ये हमरीतुमरी झाली. रात्री उशिरा पीयूष पाटील यांच्या विरोधात पोलिसात तक्रारही नोंदविण्यात आली. या घडामोडीनंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मतमोजणी दरम्यान विष्णू भंगाळे विजयी झाले.
शुक्रवारी रात्री जिल्हा पेठेतील आपल्या बंगल्यावर गेल्यानंतर विष्णू भंगाळे यांनी त्यांची इनोव्हा कार शेजारच्या मोकळ्या जागेत उभी केली. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर मागील बाजुने दगडफेक केली. ज्यामुळे काचा फुटून कारचे मोठे नुकसान झाले. शनिवारी सकाळी घडलेला प्रकार भंगाळे यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांच्या चालकाने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार दाखल केली. भंगाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदविला असला, तरी थेट कोणाचे नाव घेऊन त्यांनी संशय व्यक्त केलेला नाही. किंवा कारवरील दगडफेकीच्या घटनेचा महापालिका निवडणुकीशी देखील संबंध जोडलेला नाही. परंतु, एखाद्या राजकीय पक्षाच्या जिल्हाप्रमुखांच्या कारवर झालेल्या दगडफेकीच्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
