जळगाव : अन्न सुरक्षा मानके कायद्याने छापील कागदांमध्ये खाद्यपदार्थ गुंडाळून विक्री करण्यास बंदी घातलेली असतानाही जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील एका कॅन्टीनमध्ये सर्रास छापील कागदात वडापाव विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रत्यक्ष ग्राहक बनून कारवाई करत कॅन्टीन चालकाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाच्या परिसरातच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीनमध्ये छापील कागदात वडापाव व इतर खाद्यपदार्थ दिले जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची खातरजमा करण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकाच्या भूमिकेत संबंधित कॅन्टीनमध्ये जाऊन २० रुपयांचा वडापाव विकत घेतला. विक्रेत्याने कोणतीही शंका न बाळगता वडापाव छापील वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आपली ओळख सांगत जागेवरच तपासणी सुरू केली आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कॅन्टीन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.
जागेवरच वसूल केला दंड
तपासणीत नियमभंग सिद्ध झाल्यानंतर संबंधित कॅन्टीन चालकावर ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. चालकाने दंडाची रक्कम तत्काळ भरली. तसेच भविष्यात कोणताही वडापाव, समोसा, भजी किंवा इतर खाद्यपदार्थ छापील कागदात न देता फक्त फूड-ग्रेड कागद किंवा स्टीलच्या ताटलीतच ग्राहकांना देण्याचे आश्वासन दिले. यापुढे नियमांचे उल्लंघन झाल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.
फूड ग्रेड कागद वापरण्याचे स्पष्ट निर्देश
अन्न व औषध प्रशासनाने या कारवाईनंतर सर्व हॉटेल, कॅन्टीन, फास्ट फूड सेंटर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना गरम अथवा तेलकट पदार्थ देताना केवळ फूड-ग्रेड कागद, बटर पेपर किंवा स्टीलच्या प्लेटचाच वापर करावा. वर्तमानपत्र, जाहिरातींचे पत्रक किंवा इतर कोणताही छापील कागद वापरणे कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारे विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
छापील कागदावरील शाई धोकादायक
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, छापील कागदांवर वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये शिसे, कॅडमियम , अलाइल नॅप्थलामाइन्ससह विविध विषारी रसायने असतात. गरम, तेलकट किंवा ओलसर पदार्थ अशा कागदात ठेवले असता ही रसायने अन्नामध्ये मिसळतात. परिणामी ही घातक द्रव्ये थेट शरीरात प्रवेश करतात. दीर्घकाळ अशा अन्नाचे सेवन केल्यास पोटाचा कर्करोग, यकृताचे विकार, स्वादुपिंडाचे आजार, मूत्रपिंडाचे विकार तसेच इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.
ग्राहकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन
अन्न व औषध प्रशासनाने केवळ विक्रेत्यांनाच नव्हे, तर ग्राहकांनाही जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. वडापाव, समोसा, पोहे, भजी किंवा इतर गरम खाद्यपदार्थ छापील कागदात दिल्यास ग्राहकांनी ते स्वीकारू नयेत आणि अशा प्रकाराची माहिती अन्न व औषध प्रशासनाला द्यावी. अन्नाची सुरक्षितता ही विक्रेता आणि ग्राहक या दोघांचीही जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आता जिल्हाभर तपासणी मोहिम
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कारवाईनंतर जळगाव शहरासह जिल्ह्यातील इतर कॅन्टीन, हॉटेल, नाश्ता केंद्रे आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही तपासणी मोहीम राबविण्याची तयारी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात अशा कारवायांची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
