जळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ माफियांविरोधात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. जळगाव शहर आणि पाचोरा येथे धाडी टाकून बनावट खवा, मिठाई तयार करण्यासाठी वापरले जाणारे संशयास्पद प्रोप्रायटरी फूड, भेसळयुक्त तूप आणि क्रीम असा एकूण ९२३.४ किलो साठा जप्त करण्यात आला. या जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ३६ हजार २२२ रुपये असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिनानाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अमोल जगताप यांच्या पथकाने जळगाव शहरातील अग्रवाल वेफर्स आणि नमकीन या ठिकाणी तपासणी केली. यावेळी गुजरातहून मागविण्यात आलेले ३७० किलो वजनाचे प्रोप्रायटरी फूड आढळून आले. या साठ्याची किंमत ९३ हजार २० रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पदार्थाचा रंग, पोत आणि स्वरूप खवा किंवा बर्फीसारखे असल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने दूध आणि खव्यापासून तयार होणाऱ्या मिठाईऐवजी अशा पदार्थाचा वापर करून ग्राहकांना अस्सल मिठाई असल्याचा भास निर्माण केला जात असल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. या प्रकरणातील नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मिठाई विक्रेते आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पाचोऱ्यात बनावट खव्याचा साठा नष्ट

जळगाव शहरातील कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पाचोरा शहरातही धडक कारवाई केली. पाचोरा येथील दोन ठिकाणी तपासणी करताना बनावट खव्याचा साठा आढळून आला. सुमारे २५०० रुपये किमतीचा हा साठा प्रशासनाने नियमानुसार थेट नष्ट केला. पाचोरा येथील कारवाईदरम्यान संशयास्पद तुपाचा आणि क्रीमचा मोठा साठाही प्रशासनाच्या हाती लागला. यामध्ये १ लाख ३२ हजार ३९२ रुपये किमतीचे १७४.२ किलो संशयास्पद तूप तसेच २ लाख ८ हजार ५६० रुपये किमतीचे ३७९.२ किलो क्रीम जप्त करण्यात आले. या पदार्थांचे नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा निकषांनुसार तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईत एफडीएचे सहाय्यक आयुक्त दिनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अमोल जगताप आणि संबंधित पथकाने सहभाग घेतला.

मिठाई खरेदी करताना काळजीचे आवाहन

सणासुदीच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन काही व्यावसायिकांकडून कमी किमतीचे किंवा संशयास्पद घटक वापरले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी अत्यल्प दरात मिळणारी मिठाई, खवा, पेढे किंवा बर्फी खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ सेवन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः अन्नपदार्थांमध्ये वापरलेल्या घटकांची गुणवत्ता आणि सुरक्षितता संशयास्पद असल्यास पोटाचे विकार किंवा अन्न विषबाधेसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ग्राहकांनी विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच मिठाई खरेदी करावी, तसेच संशयास्पद पदार्थ आढळल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

माफियांविरोधात कारवाई सुरूच राहणार

गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी यांसारख्या सणांच्या काळात प्रक्रियायुक्त दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी आणि धडक कारवाया अधिक तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मिठाई, दूध, खवा, तूप, क्रीम आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पदार्थ मिळावेत, यासाठी अशा प्रकारच्या कारवायांमुळे भेसळखोरांवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे.