जळगाव : जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेले खाद्यतेल तसेच मानकांनुसार नसलेल्या शीतपेयांचा एकूण १ लाख ५५ हजार ६४० रुपयांचा साठा जप्त केला आहे. पाचोरा आणि चाळीसगाव येथे करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमुळे अन्न व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाचोरा तालुक्यातील वरखेडी-वाघोडे परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या वेळी रिफाइन्ड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदींना डावलून खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यापाऱ्याकडे पॅकिंगविना मोठ्या प्रमाणावर तेल साठवून विक्री सुरू असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत तेलाचे नमुने विश्लेषणासाठी जप्त केले. तसेच उर्वरित ४४८ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला.
या साठ्याची किंमत ८० हजार ६४० रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात संबंधित उत्पादक आणि पुरवठादारांपर्यंत चौकशीचा तपास विस्तारण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करून खुल्या स्वरूपात खाद्यतेल विक्री केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चाळीसगाव शहरातही कारवाई
याशिवाय, चाळीसगाव येथे विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मॉन्स्टर एनर्जी आणि ‘झिरो एनर्जी मॉन्स्टर एनर्जी अल्ट्रा’ या कार्बोनेटेड कॅफिनयुक्त शीतपेयांचे नमुने मानकांनुसार नसल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी या शीतपेयांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून संबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान ३५० मिलीचे ४८० कॅन, ज्यांची किंमत सुमारे ६० हजार रुपये आहे. तसेच ३५० मिलीचे १२० कॅन, ज्यांची किंमत १५ हजार रुपये आहे. असा एकूण ७५ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित शीतपेयांच्या विक्रीसाठी आवश्यक परवान्यांबाबतही अनियमितता आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
या प्रकरणी संबंधित पुरवठादार आणि उत्पादकांविरोधात पुढील कारवाई करण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बाजारात वितरित करण्यात आलेला संबंधित उत्पादनांचा साठा तातडीने परत मागविण्याबाबत उत्पादक कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.
यापुढेही कठोर भूमिका घेणार
अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादनांविरोधात प्रशासन कठोर भूमिका घेणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे यांच्या देखरेखीखाली पार पडली. जळगाव येथील सहायक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, शरद पवार आणि योगराज सूर्यवंशी यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
अन्न व औषध प्रशासनाने सर्व व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचे खाद्यतेल खुल्या स्वरूपात विक्री न करण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. ग्राहकांनी देखील केवळ पॅकबंद आणि मान्यताप्राप्त खाद्यपदार्थांची खरेदी करावी, असे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही भेसळ, निकृष्ट अन्नपदार्थ विक्री किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
