जळगाव : शहरालगतच्या फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर चालविल्याप्रकरणी सध्या नाशिक कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेले जळगावचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक ललित कोल्हे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यासाठी वर्ग करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुंबईतील सुतार चाळ परिसरात राहणारे आणि कार भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे कृष्णा धनाराम देवासी (२९) यांनी या संदर्भात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ललित कोल्हे यांनी सुमारे ६८ लाख रुपये किंमतीची लक्झरी कार अवघ्या ३८ लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याचे आमिष देवासी यास दाखवले. कमी किमतीत महागडी कार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली त्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. वाहन खरेदी प्रक्रियेसाठी १० टक्के आगाऊ रक्कम आवश्यक असल्याचे सांगून देवासी याच्याकडून रक्कम उकळण्यास सुरुवात केली. २४ नोव्हेंबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत विविध व्यवहारांद्वारे पैसे स्वीकारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

टप्प्याटप्प्याने १४.३९ लाखांची वसुली

पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ललित कोल्हे यांनी स्वतःच्या बँक खात्यावर तसेच राकेश चंदू अंगारीया आणि एका हॉटेलच्या खात्यावर एकूण १४ लाख ३९ हजार १०० रुपये वळते करून घेतले. सर्व व्यवहार बँक ट्रान्सफरद्वारे करण्यात आले असून, संबंधित खात्यांची माहिती पोलिसांनी तपासासाठी मागवली आहे. रक्कम दिल्यानंतर कृष्णा देवासी यास काही काळ वाहन वितरणाबाबत आश्वासने देण्यात आली. मात्र, वाहन न मिळाल्याने आणि दिलेली रक्कमही परत न केल्याने देवासी यांनी चौकशी सुरू केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. कृष्णा देवासी यांच्या तक्रारीवरून २२ एप्रिल २०२५ रोजी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित कलमान्वये पोलिसांचा तपास सुरू असून, आर्थिक व्यवहारासह मोबाईल कॉल रेकॉर्ड, बँक स्टेटमेंट्स तसेच इतर पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.

नाशिक कारागृहातून वर्ग करण्याची प्रक्रिया

दरम्यान, ललित कोल्हे हे जळगावात गाजलेल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणात आधीच अटकेत असून सध्या नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईतील नव्या गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी त्यांना वर्ग करून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. न्यायालयीन परवानगी मिळाल्यानंतर त्यांना या प्रकरणात अटक दाखल करून पुढील चौकशी केली जाणार आहे. एकीकडे बोगस कॉल सेंटर प्रकरण आणि दुसरीकडे कार विक्रीतील कथित फसवणूक प्रकरण, अशा दुहेरी प्रकरणांमुळे ललित कोल्हे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या आर्थिक व्यवहारात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील पुढील न्यायालयीन कार्यवाही तसेच वर्ग प्रक्रियेवरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.