जळगाव : सुमारे पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०२५ मध्ये माजी खासदारासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर चारपैकी एका संचालकाला पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. न्यायालयाने त्यास बुधवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेत रांजणगाव येथील उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीच्या नावाने सुमारे पाच कोटी ३३ लाख ८५ हजार रूपयांचे औद्योगिक कर्ज काही वर्षांपूर्वी घेण्यात आले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत परतफेड न झाल्याने संबंधित खाते कालांतराने एनपीए म्हणून घोषित करण्यात आले. बँकेने कंपनीला परतफेडीसाठी अतिरिक्त मुदत दिली; परंतु कर्जाची रक्कम वेळेवर भरली न गेल्याने बँकेने कायदेशीर कारवाई सुरू केली. दरम्यानच्या काळात कंपनीचे संचालक माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांनी बँकेकडे गहाण ठेवलेली यंत्र सामग्री संगनमताने विकल्याचे उघड झाले. या व्यवहारामुळे देवगिरी बँकेला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला.

देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानुसार माजी खासदार पाटील यांच्यासह इतर संशयितांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला गुन्हा नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्यातील संशयितांपैकी प्रशांत राजेंद्र वाघ यास २६ मे रोजी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी पोलिसांकडून अटक करण्यात आली. अटकेनंतर संशयिताला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता ३० मेपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान संशयितांकडून यंत्र सामुग्रीच्या विक्रीचा व्यवहार, आर्थिक व्यवहारातील इतर संबंधित व्यक्ती, कर्ज रकमेचा वापर तसेच विक्रीतून प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील याबाबत सखोल चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

माजी खासदाराच्या मालमत्तेवर टाच

फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी खासदार उन्मेश पाटील यांनी जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यावेळी पाटील यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला होता. तरीही १५ जुलै २०२५ रोजी बजावलेल्या नोटीसीनुसार देवगिरी सहकारी बँकेने पाटील यांच्या नावावर चाळीसगाव येथे असलेली ७११.६० चौरस मीटर क्षेत्रफळ मालमत्ता जप्तीची कारवाई केली. जप्त केलेली मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या अधिनियमानुसार एक जानेवारी २०२६ रोजी ताब्यातही घेण्यात आली. विशेष म्हणजे माजी खासदार पाटील यांनी अलिकडेच ठाकरे गटातून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.