जळगाव – जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादकांना पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेतून मुदत संपल्यानंतरही कोणतीच नुकसान भरपाई मिळाली नव्हती. मात्र, उशिरा का होईना ५३ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर सुमारे ४२१ कोटींची विमा रक्कम जमा होण्यास आता सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यात २०२४-२५ करिता पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (आंबिया बहार) अंतर्गत मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा आणि पपई, या अधिसूचित फळपिकांचा समावेश करण्यात आला होता. आणि सदरची योजना भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत राबविण्यात आली. मात्र, हवामान बदलामुळे झालेल्या फळपिकांच्या नुकसान भरपाईची विमा रक्कम सदर कंपनीकडून वेळेवर वितरीत झाली नाही. केळी उत्पादक शेतकऱ्यांना साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विम्याचा लाभ मिळत असे. मात्र, यंदा संबंधित विमा कंपनीने मुदत संपल्यानंतरही पात्र महसूल मंडळांची यादी जाहीर केली नाही. केळी उत्पादकांना फळपीक विम्याची रक्कम मिळण्यात झालेल्या विलंबाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखेर जळगावमध्ये काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. त्यानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केळी पीक विम्याचा प्रश्न सोडविण्याबाबतचे निवेदन दिले होते.
दरम्यान, फळपीक विम्यातून केळी उत्पादकांना भरपाई मिळण्यात झालेल्या विलंबाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही लक्ष घातले होते. तसेच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे तसेच खासदार स्मिता वाघ आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी फळपिक विमा भरपाई प्रकरणी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागासोबत नियमित बैठका घेऊन भारतीय कृषी विमा कंपनीला तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, विमा कंपनीकडून नुकतीच हेक्टरी पे-आऊट रक्कमेची माहिती प्राप्त देखील झाली. संपूर्ण आणि अचूक माहिती मिळविण्यासाठी कृषी विभागाकडून कंपनीशी सतत संपर्क साधला जात होता.
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर विमा रक्कम जमा होईल, असा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यापूर्वी केला होता. प्रत्यक्षात, जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५३ हजार ३३० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे ४२० कोटी ७२ लाख १९ हजार ४९ रूपयांची विमा रक्कम जमा होण्यास दिवाळीपूर्वीच सुरूवात झाली आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः समाज माध्यमावर दिली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर विमा रकमेचे पैसे जमा झाल्याबद्दल आलेल्या संदेशांचे स्क्रीन शॉट त्यांनी शेअर केले आहेत.
