जळगाव : महानगरपालिकेच्या एकेकाळी गाजलेल्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या मूळ फाईली अभिलेख कक्षातून गहाळ झाल्याचे समोर आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या या फाईली वारंवार मागणी करूनही उपलब्ध न झाल्याने अखेर महानगरपालिका प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणात फाईल गहाळ होण्यामागील नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
याप्रकरणी नगर रचनाकार तथा प्रभारी सहाय्यक संचालक अमोल वसंतराव पाटील (३२) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, नगर रचनाकार विभागातील अभिलेख व महत्त्वाची कागदपत्रे महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येतात. त्यानुसार, सन २००६ मधील घरकूल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित गट क्रमांक ३३७/३ अ/१ आणि गट क्रमांक ३३७/३ अ/२ या जागांच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या मूळ फाईलीही याच अभिलेख कक्षात सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. त्या फाईली न्यायालयीन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
दीड वर्षांपासून फाईली गायब
३१ जानेवारी २०२४ पासून न्यायालयीन कामकाजासाठी घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित फाईलींची वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगर रचनाकार विभागातील अभिलेख कक्षासह संपूर्ण विभागात सखोल शोध मोहीम राबविण्यात आली. तरीही संबंधित दोन्ही मूळ फाईली सापडल्या नाहीत. त्यामुळे या फाईली रेकॉर्ड रूममधून कोणीतरी विनापरवानगी काढून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी २०२४ ते २ जुलै २०२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड रूममधून संबंधित फाईली चोरून नेल्याचा संशय आहे. या फाईली गहाळ झाल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अभिलेख सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; पोलिसांचा तपास
या घटनेमुळे जळगाव महानगरपालिकेतील अभिलेख व्यवस्थापन आणि महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः घरकुल गैरव्यवहारासारख्या संवेदनशील प्रकरणातील मूळ फाईलीच गायब झाल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. फाईली निष्काळजीपणामुळे हरवल्या की त्या जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्या, याचा तपास आता पोलीस करणार आहेत. शहर पोलीस ठाण्याने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रेकॉर्ड रूममध्ये प्रवेश करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती, अभिलेख कक्षातील नोंदी, संबंधित कागदपत्रांची हालचाल, तसेच उपलब्ध तांत्रिक पुरावे आणि इतर बाबींची सखोल पडताळणी केली जाणार आहे. या तपासातून फाईली गहाळ होण्यामागील नेमके कारण समोर येते का आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
