जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत रक्षाबंधनाच्या दिवशी शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेल्याने दागिन्यांसह भेटवस्तू खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना धक्का बसला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर दोन्ही धातूंचे दर पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरल्याचे दिसून आले.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांच्या आक्रमक वक्तव्यानंतर जागतिक कमोडिटी बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला आहे. वॉर्श यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकन डॉलरमध्ये मोठी वाढ झाली. त्याचबरोबर अमेरिकन रोख्यांवरील उत्पन्नही वाढले. डॉलर आणि बॉण्ड यील्ड मजबूत झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी असलेल्या सोन्यावर विक्रीचा दबाव वाढला. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत सुमारे ३.२ टक्क्यांची घसरण झाली.

कॉमेक्सवर सोन्याचा दर सुमारे ४,५०२ डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आला. भारतीय बाजारातही या घसरणीचा परिणाम दिसून आला असून सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. चांदीच्या किमतीत सोन्यापेक्षा अधिक तीव्र घसरण झाली. जागतिक बाजारात चांदी सुमारे ४.३ टक्क्यांनी घसरून ६६.३१ डॉलर प्रति औंसवर आली. वॉर्श यांच्या भूमिकेमुळे सप्टेंबरमध्ये फेडकडून व्याजदर वाढीची शक्यता वाढल्याचे बाजारात मानले जात आहे. व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदारांना अमेरिकन रोखे आणि डॉलरमधून तुलनेने आकर्षक परतावा मिळू शकतो. त्यामुळे व्याज उत्पन्न न देणाऱ्या सोन्या-चांदीवरील गुंतवणुकीचा आकर्षण काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

भारतीय बाजारातील सोन्या-चांदीचे दर मात्र केवळ आंतरराष्ट्रीय किमतींवर ठरत नाहीत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, आयात शुल्क, स्थानिक मागणी आणि देशांतर्गत बाजारातील व्यवहार यांचाही दरांवर परिणाम होतो. आगामी काळात अमेरिकेतील महागाईचे आकडे, फेडचा व्याजदर निर्णय, डॉलरची दिशा आणि अमेरिकन बॉण्ड यील्ड हे सोन्या-चांदीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. महागाई कमी झाली आणि व्याजदर वाढीची शक्यता कमी झाली तर सोन्या-चांदीला पुन्हा आधार मिळू शकतो. मात्र फेडने कठोर भूमिका कायम ठेवली तर मौल्यवान धातूंवरील दबाव आणखी काही काळ राहण्याची शक्यता आहे.

सोन्याचे दर किती कमी झाले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी रक्षाबंधनाच्या दिवशी ८२४ रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६४,२८५ रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर २८८४ रुपयांची घट झाल्याने सोने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६१,४०१ रुपयांपर्यंत घसरले.

चांदीचे दर किती कमी झाले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी ५१५० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,५४,४१० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी शनिवारी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर तब्बल ७२१० रुपयांची घसरण झाल्याने चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४७,२०० रुपयांपर्यंत खाली आली.