जळगाव : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील सुवर्ण बाजारपेठेत खरेदीची लगबग सुरू होण्याची चिन्हे दिसत असतानाच सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या तसेच महिन्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, सोन्या-चांदीत मोठी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी रात्री आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत अचानक मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केल्याने दोन्ही धातूंच्या किमती दबावाखाली आल्या. परिणामी, सोन्याचे दर गेल्या ११ महिन्यांतील नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत ३.३ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण नोंदविण्यात आली. सोन्याने प्रति औंस ३ हजार ९०० डॉलरची महत्त्वपूर्ण पातळी तोडत ३ हजार ८८० डॉलरपर्यंत नीचांक गाठला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरनंतर प्रथमच सोन्याचा भाव या पातळीवर पोहोचला आहे. व्यवहारादरम्यान सोन्याच्या किमतीत २.७९ टक्क्यांची घसरण होऊन भाव ३ हजार ९२१.३२ डॉलर प्रति औंस झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठांवरही झाला असून जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेतही सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव ५.१२ टक्क्यांनी घसरून प्रति औंस ४९.७० डॉलर या नीचांकी पातळीवर पोहोचला. गेल्या काही काळात सोन्याप्रमाणेच चांदीकडेही गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जात होते. मात्र, अचानक झालेल्या दर कपातीमुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम
सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीमागे अनेक आंतरराष्ट्रीय घटक कारणीभूत असल्याचे बाजारातील जाणकारांचे मत आहे. अमेरिकेची सकल राष्ट्रीय उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली आल्याने अर्थव्यवस्थेची स्थिती मजबूत असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचवेळी महागाईचा दरही उच्च पातळीवर कायम आहे. त्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीऐवजी कठोर आर्थिक धोरण कायम ठेवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर आणि अमेरिकन ट्रेझरी बाँडवरील वाढते उत्पन्न यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हमधील अधिकाऱ्यांमध्येही व्याजदरांच्या पुढील निर्णयाबाबत वेगवेगळी मते असल्याने बाजारातील अनिश्चितता वाढली आहे. वाढत्या व्याजदरांच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीऐवजी इतर आर्थिक पर्यायांकडे वळत असल्याचे चित्र आहे.
जळगावात सोन्याचे दर किती?
आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत दिसून आला. शुक्रवारी शहरात २४ कॅरेट सोन्याचा दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ४५ हजार ४४६ रुपये होता. त्यानंतर शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडताच सोन्याच्या दरात आणखी २५९६ रुपयांची घट झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ४२ हजार ८५० रुपयांवर आला.
चांदी आता किती स्वस्त?
चांदीच्या दरातही शनिवारी घसरण नोंदविण्यात आली. शुक्रवारी जळगावच्या बाजारपेठेत चांदीचा भाव तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो १ लाख ८९ हजार ५२० रुपये होता. शनिवारी बाजारपेठ सुरू होताच दरात आणखी १०३० रुपयांची घट झाली. त्यामुळे चांदीचा भाव जीएसटीसह प्रति किलो १ लाख ८८ हजार ४९० रुपयांपर्यंत घसरला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. सणासुदीच्या काळात दागिने, सोन्याची नाणी आणि चांदीच्या वस्तू खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना कमी दराचा फायदा मिळू शकतो. विशेषतः लग्नसराई आणि सणांच्या खरेदीसाठी सोने घेण्याची तयारी करणाऱ्या कुटुंबांना या दरकपातीमुळे काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे.
