जळगाव : अमेरिका–इराण तणावाचा परिणाम शहरातील सुवर्ण बाजारपेठेवर एकच दिवस जाणवला. दुसऱ्या दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा चढउतार सुरु झाल्याने लग्नसराई तसेच सणासुदीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उलाढाल पूर्ववत झाल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, होळीच्या दुसऱ्या दिवशी भारतात दोन्ही धातुंच्या किमतीत घसरण नोंदवली गेल्याने बाजाराला थोडासा दिलासा मिळाला आहे. होळीच्या निमित्ताने सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही घसरण एक चांगली संधी ठरू शकते. दुसरीकडे, चांदीच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. तरीही तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीच्या किमतीतील ही घसरण फार काळ टिकेल असे वाटत नाही.

२८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे प्रत्युत्तर दिले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे तणाव अधिकच वाढला. या घटनांमुळे जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. आणि गुंतवणूकदारांनी सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला. अमेरिका आणि इस्रायल-इराण संघर्ष दीर्घकाळ चालल्यास अनिश्चितता पुन्हा वाढू शकते. त्यामुळे सोने आणि चांदीची मागणी तसेच दर पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोन्याचे दर आता किती?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी १२ हजार रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ७५ हजार ९२४ रुपयांपर्यंत वधारले होते. तर सोमवारी दिवसभरात २३६९ रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ७३ हजार ५५५ रुपयांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी सकाळी पुन्हा १२३६ रुपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ७२ हजार ३१९ रुपयांपर्यंत घसरले.

चांदीचे दर आता किती?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी २३ हजार ६९० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो तीन लाख तीन हजार ८५० रुपयांपर्यंत पोहचले होते. तर सोमवारी दिवसभरात आणखी ३०९० रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति किलो तीन लाख सहा हजार ९४० रुपयांपर्यंत वधारले होते. मात्र, मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर तब्बल १३ हजार ३९० रुपयांची घट झाली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ९३ हजार ५५० रुपयांपर्यंत घसरले. परिणामी, ग्राहकांना दिलासा मिळाला.