जळगाव : अमेरिका–इराण देशांमधील तणावाचा परिणाम ओसरल्यानंतर शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात आणखी घसरण नोंदवली गेली. दरवाढीच्या भितीने दागिने खरेदीपासून लांब राहिलेल्या ग्राहकांना त्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळाला. सुवर्ण व्यावसायिकांनीही उलाढाल सुरळीत झाल्याने समाधान व्यक्त केले.
देशांतर्गत बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण होत असून, त्यामुळे गुंतवणूकदारांसह दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात खरेदी करणाऱ्यांसाठी ही घसरण फायदेशीर ठरू शकते. मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक वित्तीय बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांचा शोध घेत आहेत. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये चढ-उतार दिसून येत असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही होत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे बाजारातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यामुळे सोन्याच्या बाजारात काही प्रमाणात खरेदी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दरात घट झाल्यामुळे ग्राहक पुन्हा बाजारात सक्रिय होऊ लागले आहेत. दरम्यान, होळीचा सण आणि त्यानंतर सुरू होणारा लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता अनेकांकडून सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळे सध्याची दरातील घट ग्राहकांसाठी अनुकूल ठरत आहे.
काही ग्राहक भविष्यातील दरवाढ लक्षात घेऊन सध्याच्या कमी दरांचा फायदा घेण्याच्या तयारीत असल्याचेही दिसून येत आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावरील आर्थिक घडामोडींसह अमेरिकन डॉलरची हालचाल, व्याजदरातील बदल तसेच मध्य पूर्वेतील तणाव या घटकांचा सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीतील बदलानुसार देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर चढ-उतार अनुभवत आहेत.
सोन्याचे दर किती कमी झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी २३६९ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह एक लाख ७३ हजार ५५५ रुपयांपर्यंत खालावले होते. तर मंगळवारी पुन्हा ३६०५ रुपयांची घट झाल्याने दर एक लाख ६९ हजार ९५० रुपयांपर्यंत खाली आले होते. बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी २९८७ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६६ हजार ९६३ रुपयांपर्यंत घसरले.
चांदीचे दर किती कमी झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी ३०९० रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो तीन लाख सहा हजार ९४० रुपयांपर्यंत वधारले होते. मात्र, मंगळवारी दिवसभरात तब्बल १३ हजार ३९० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ९३ हजार ५५० रुपयांपर्यंत घसरले. याशिवाय, बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यानंतर आणखी १२ हजार ३६० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८१ हजार १९० रुपयांपर्यंत घसरले.
