जळगाव : अमेरिका-इस्त्राईल विरुद्ध इराण वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून सोनेचांदीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत.शहरातील सुवर्ण बाजारपेठेतही सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदी दरात मोठी घट नोंदवली गेली. त्यामुळे ग्राहकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला.
अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची काही प्रमाणात मागणी वाढली असली, तरी मजबूत डॉलरमुळे किमतींवर दबाव निर्माण होत आहे. देशांतर्गत सुवर्ण बाजारातही याच घटकांचा प्रभाव अलीकडे जाणवत असल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांचे म्हणणे आहे.
युद्धादरम्यान सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. अमेरिकन डॉलर निर्देशांकाच्या सततच्या मजबूतीमुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर ब्रेक लागला आहे. गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून अमेरिकन बाँडमध्ये गुंतवणूक करत आहेत. शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी ते सोन्यातून पैसे काढत आहेत.
नफा बुकिंगमुळे सोने विकले जात आहे. आणि किमती घसरत आहेत. इराण युद्धादरम्यान, गुंतवणूकदार सोन्याऐवजी सुरक्षित चलन डॉलरकडे अधिक वळत आहेत. मजबूत डॉलर निर्देशांक आणि फेडरल रिझर्व्हकडून उच्च व्याजदरांमुळे सोन्यावर मोठा दबाव आला आहे.युद्ध आणि तणावाच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत झपाट्याने वाढ होते हे अनेकदा दिसून येते.
अस्थिरतेमध्ये सुरक्षित सोन्याची मागणी वाढते, ज्यामुळे सोन्याच्या किमती वाढतात. गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये त्यांची गुंतवणूक वाढवतात. तथापि, इराण-अमेरिका युद्धादरम्यान परिस्थिती वेगळी आहे. मध्य पूर्वेतील संघर्षादरम्यान देशांतर्गत बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय घट होत आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या खरेदीसाठी पुढे आलेल्या ग्राहकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
सोन्याचे दर किती घटले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी १६४८ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ८७३ रुपयांपर्यंत घसरले होते. तर शनिवारी दिवसभरात पुन्हा १४४२ रुपयांची घट नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६२ हजार ४३१ रुपयांपर्यंत खालावले होते. सोमवारी सकाळी पुन्हा १७५१ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६० हजार ६८० रुपयांपर्यंत घसरले.
चांदीचे दर किती घटले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी तब्बल १० हजार ३०० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७२ हजार ९५० रुपयांपर्यंत घसरले होते. तर शनिवारी दिवसभरात १०३० रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७३ हजार ९८० रुपयांपर्यंत पोहचले होते. सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर मात्र १० हजार ३०० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ६३ हजार ६८० रुपयांपर्यंत घसरले.
