जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत पितृपक्ष सुरु होत नाही तेवढ्यातच सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीचे दर अचानक घसरले. देशांतर्गत वायदे बाजारातही सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.

तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सोन्याच्या तेजीला सध्या ब्रेक लागला असून अमेरिकन बाँड यील्डमधील वाढ, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीच्या अपेक्षा आणि मजबूत होत असलेल्या डॉलरचा मौल्यवान धातूंवर दबाव आला आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात जवळपास ११ टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे ६ टक्क्यांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव २.५८ टक्क्यांनी म्हणजेच सुमारे १११ डॉलरने घसरून ४,२०९ डॉलरपर्यंत खाली आला आहे. सध्याच्या घसरणीमागे अमेरिकेच्या व्याजदर धोरणाबाबतची बाजारातील अपेक्षा आणि डॉलरची मजबुती ही प्रमुख कारणे आहेत. डॉलर निर्देशांकही वाढला आहे. सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये ठरवली जात असल्याने डॉलर मजबूत झाल्यास इतर चलनांमधील गुंतवणूकदारांसाठी सोने महाग होते आणि त्याच्या मागणीवर दबाव येऊ शकतो.

वाढलेले अमेरिकी बाँड यील्ड हे देखील सोन्यासाठी नकारात्मक ठरत आहे. व्याज देणाऱ्या मालमत्तांमधून मिळणारा परतावा वाढल्याने गुंतवणूकदारांचा काही निधी सोन्याऐवजी बाँड आणि इतर मालमत्तांकडे वळू शकतो. मात्र, सोन्याला आधार देणारे घटकही कायम आहेत. महागाईचा धोका, भू-राजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता वाढल्यास सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी पुन्हा वाढू शकते. त्यामुळे सध्या सोने दोन परस्परविरोधी शक्तींच्या प्रभावाखाली आहे. चांदीच्या दरावरही डॉलरची मजबुती आणि व्याज दरवाढीच्या अपेक्षांचा दबाव दिसून आला आहे. आगामी काळात फेडरल रिझर्व्हचे निर्णय, अमेरिकी महागाईचे आकडे, बाँड यील्ड आणि डॉलर निर्देशांक यांचा सोने-चांदीच्या दरावर मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात मौल्यवान धातूंच्या बाजारात अस्थिरता कायम राहू शकते.

सोन्याचे दर किती घसरले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी ७२१ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५६,०४५ रुपयांपर्यंत खाली आले होते. सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी तब्बल २७८१ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,२६४ रुपयांपर्यंत घसरले.

चांदीचे दर किती घसरले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी २०६० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,३९,९९० रुपयांपर्यंत खाली आले होते. सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी तब्बल ७२१० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३२,७८० रुपयांपर्यंत घसरले.