जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत रक्षाबंधनानंतर सोने, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अवघ्या चार दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल ५,९७४ रुपयांची घट झाली, तर चांदीच्या दरात प्रति किलो १३ हजार ३९० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असून आगामी काळात दर आणखी कोणत्या दिशेने जातील, याकडे व्यापारी आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर मोठ्या गुंतवणुकदारांसह सामान्य ग्राहकांचे बाजाराच्या हालचालींकडे आता लक्ष लागले आहे.

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी तीन टक्के जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ६४ हजार २८५ रुपयांवर होता. त्यानंतर सलग चार दिवसांत दरात ५,९७४ रुपयांची घट झाली. त्यामुळे १ सप्टेंबरपर्यंत सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ५८ हजार ३११ रुपयांपर्यंत खाली आला.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

जळगावात रक्षाबंधनाच्या दिवशी दिवशी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी चांदीचा दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २ लाख ५४ हजार ४१० रुपये होता. पुढील चार दिवसांत चांदीच्या दरात १३ हजार ३९० रुपयांची घट झाली. परिणामी, १ सप्टेंबर रोजी चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो २ लाख ४१ हजार २० रुपयांपर्यंत खाली आला. सोन्या–चांदीच्या दरातील या घसरणीमुळे लग्नसराई, सणासुदीच्या खरेदीसाठी बाजाराकडे पाहणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मोदींच्या आवाहनानंतर बाजारावर परिणाम?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना गरज नसताना सोने खरेदी न करण्याचे आवाहन पुन्हा केले आहे. यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारचे आवाहन केले होते. त्यानंतर देशांतर्गत बाजारात सोन्याच्या विक्रीत सुमारे २० टक्क्यांनी घट झाल्याचे बाजारातील सूत्रांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे यावेळीही मोदींच्या आवाहनाचा ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयावर कितपत परिणाम होतो, याकडे सुवर्ण बाजाराचे लक्ष आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्या–चांदीच्या दरातील घसरणीमागे केवळ देशांतर्गत मागणीतील बदल कारणीभूत नसून आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही मोठा प्रभाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची विक्री वाढली असून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे जागतिक महागाईची चिंताही पुन्हा वाढली आहे.

व्याजदरांकडे बाजाराचे लक्ष

महागाईच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरविषयक भूमिकेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यास सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याची प्रवृत्ती काही प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे सोन्याच्या दरावर दबाव निर्माण होण्याची शक्यता असते. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांबाबत कठोर भूमिका घेतली जाण्याची शक्यता वाढल्याने अलीकडील काळात सोन्याच्या बाजारात अस्थिरता दिसून आली आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी बाजारासाठी महत्त्वाची ठरणार आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील आकडेवारीनंतर अमेरिकेच्या रोजगार बाजाराशी संबंधित महत्त्वाचा अहवाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. या आकडेवारीवरून अमेरिकेतील अर्थव्यवस्थेची स्थिती आणि फेडरल रिझर्व्हच्या आगामी व्याजदर धोरणाबाबत बाजाराला संकेत मिळू शकतात.

तज्ज्ञांचा ग्राहकांना काय सल्ला?

सोन्या–चांदीच्या दरात झालेली सध्याची घसरण कायम राहणार की पुन्हा दरवाढ होणार, याबाबत बाजारात सध्या अनिश्चितता आहे. अमेरिकेतील रोजगार आणि महागाईशी संबंधित आकडेवारी, कच्च्या तेलाचे दर, आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव तसेच डॉलर आणि व्याजदरातील बदल या सर्व घटकांचा आगामी काळातील सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीचा निर्णय घेताना बाजारातील पुढील घडामोडींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.