जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या आठवडाभरापासून सातत्याने दरवाढ होत असल्याने सोने आणि चांदीच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या होत्या. मात्र, गुरुवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दरात घट नोंदवली गेल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला.

लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या दरांमध्ये आलेल्या या घसरणीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांचेही लक्ष वेधले गेले आहे. विशेषतः जळगावसारख्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गुरुवारी सकाळच्या सत्रात सोने व चांदीच्या वायदा दरातही नरमाई दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत संकेत, डॉलरच्या मूल्यातील हालचाल आणि नफा वसुलीच्या पार्श्वभूमीवर ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. २४ कॅरेट सोने तसेच चांदीच्या दरात प्रति किलो घसरण दिसून आल्याने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही संधी महत्त्वाची ठरत आहे.

गुंतवणूकदारांसाठी संकेत काय?

गेल्या वर्षभरात सोने आणि चांदीने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. भू-राजकीय तणाव, महागाईची भीती आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे मौल्यवान धातूंना मागणी वाढली होती. मात्र, सध्याची दर घसरण ही अल्पकालीन दुरुस्ती असू शकते, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामामुळे भौतिक सोन्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची घसरण ही खरेदीची संधी मानली जात आहे. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूक करताना आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, व्याजदर धोरणे आणि रुपयाच्या मूल्यातील चढउतार यांचा विचार करणे आवश्यक आहे. पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि डॉलरच्या हालचालींवर सोने-चांदीच्या दराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

सोन्याच्या दरात किती घट?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी ७२१ रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार २८५ रुपयांपर्यंत पोहचले होते. तर बुधवारी दिवसभरात आणखी ३०९ रुपयांची किरकोळ वाढ नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार ५९४ रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, गुरुवारी सकाळी बाजार उघडल्यावर ५१५ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार ०७९ रुपयांपर्यंत खाली आले.

चांदीच्या दरात किती घट?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी १०३० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८० हजार १६० रुपयांपर्यंत पोहचले होते. तर बुधवारी दिवसभरात आणखी १०३० रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८१ हजार १९० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, गुरुवारी सकाळी बाजार उघडल्यावर ३०९० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७८ हजार १०० रुपयांपर्यंत खाली आले.