जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात चढ-उतार सुरु असताना, शुक्रवारी सकाळी पुन्हा मोठा उलटफेर झाला. मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या अमेरिका, इस्रायल–इराण संघर्षामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठेत मोठी अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर दिसून येत आहे.
विशेषतः सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून, सध्या बाजारात घसरणीचा कल दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढली होती. मात्र, परिस्थिती जसजशी बदलत गेली तसतसे जागतिक आर्थिक घटकांनी वेगळे चित्र निर्माण केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर मोठ्या कारवाईचा इशारा दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता अधिकच वाढली आहे. दरम्यान, डॉलरमध्ये ०.५ टक्क्यांची मजबुती येऊन तो ९९ ते १०० या पातळीवर पोहोचला आहे. डॉलर मजबूत झाल्यास सोन्यासारख्या मौल्यवान धातूंवर दबाव येतो, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत डॉलरमध्ये मोजली जाते. परिणामी, गुंतवणूकदारांनी सोन्यावरील गुंतवणूक कमी करत इतर पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, इस्रायलसह अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संघर्षाचा त्वरित तोडगा निघेल, अशी शक्यता कमी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक तेल पुरवठ्यात या मार्गाचे महत्त्व लक्षात घेता, येथे कोणताही व्यत्यय आला तर त्याचा मोठा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. जर होर्मुझ सामुद्रधुनीत दीर्घकाळ नाकेबंदी झाली, तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढतील. कदाचित महागाई वाढण्याचा धोका निर्माण होईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू शकतात, ज्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मात्र बाजारात अस्थिरता कायम असून सोने-चांदीच्या दरांमध्ये दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहेत. देशांतर्गत बाजारातही याचे पडसाद उमटत असून ग्राहक आणि गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. लग्नसराईच्या हंगामात दरातील या अस्थिरतेमुळे खरेदीवरही परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सोन्याचे दर आता कुठपर्यंत?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ३५०२ रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५५ हजार ९४२ रुपयांपर्यंत वधारले होते. तर गुरुवारी २१६३ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५३ हजार ७७९ रुपयांपर्यंत खाली आले होते. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा २५७५ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५१ हजार २०४ रुपयांपर्यंत घसरले.
चांदीचे दर आता कुठपर्यंत?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ४१२० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५३ हजार ३८० रुपयांपर्यंत वधारले होते. तर गुरुवारी दिवसभरात ६१८० रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४७ हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले होते. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ६१८० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४१ हजार २० रुपयांपर्यंत घसरले.
