जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. अधिक मास संपल्यानंतर पुन्हा लग्नसराई सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर दागिन्यांच्या खरेदीसाठी इतके दिवस थांबून असलेल्या ग्राहकांना त्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळाला.

केंद्र सरकारने १३ मेपासून सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर देशातील मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठे बदल दिसून येत आहेत. या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम सोन्याच्या आयातीवर झाला असून, आयातीत सुमारे ७० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामागे व्यापार तूट नियंत्रित ठेवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत आर्थिक स्थैर्य राखणे हा प्रमुख उद्देश असल्याचे मानले जाते. अधिकृत माहितीनुसार, शुल्कवाढीपूर्वी भारतात दरमहा सरासरी ७५ ते १०० टन सोन्याची आयात होत होती. मात्र, आयात शुल्कात झालेल्या मोठ्या वाढीनंतर हा आकडा घसरून केवळ २५ ते ३० टनांपर्यंत आला आहे. आयात महाग झाल्यामुळे ज्वेलर्स, व्यापारी आणि गुंतवणूकदारांनी खरेदीचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत काही प्रमाणात घट झाल्याचे चित्र दिसत आहे.

बाजार विश्लेषकांच्या मते, गेल्या काही महिन्यांत विक्रमी उंची गाठलेल्या सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये अलीकडे घसरण दिसून आली आहे. देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी, गुंतवणूकदारांचा वाढलेला आत्मविश्वास आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची मजबूत होत असलेली स्थिती यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांमधून काही प्रमाणात निधी बाहेर काढला आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही सोन्या-चांदीच्या दरांवर परिणाम झाला आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणात्मक निर्णयानंतर जागतिक वित्तीय बाजारात मोठी हालचाल झाली. नवीन फेडरल रिझर्व्ह अध्यक्ष केविन वॉर्श यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले. व्याजदर वाढीची शक्यता निर्माण झाल्यास सोने सामान्यतः कमी आकर्षक ठरते, कारण सोने कोणतेही व्याज उत्पन्न देत नाही. परिणामी, गुंतवणूकदार रोखे, बँक ठेवी किंवा इतर व्याज देणाऱ्या साधनांकडे वळतात. याच कारणामुळे फेडरल रिझर्व्हच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आहे.

सोन्याचे दर कुठपर्यंत?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ६१८ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५४,५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. तर गुरुवारी आणखी ११३३ रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,३६७ रुपयांपर्यंत घसरले होते. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा ४३२६ रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४९,०४१ रुपयांपर्यंत स्वस्त झाले. सोन्याच्या दरात गेल्या चार दिवसांत तब्बल ६१८० रुपयांची घसरण झाल्याची नोंद घेतली गेली.

चांदीचे दर कुठपर्यंत?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी बुधवारी १०३० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,५९,५६० रुपयांपर्यंत खाली आले होते. तर गुरुवारी आणखी ५१५० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,५४,४१० रुपयांपर्यंत घसरली होती. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा १४,४२० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३९,९९० रुपयांपर्यंत स्वस्त झाली. चांदीच्या दरात गेल्या चार दिवसांत तब्बल २३,६९० रुपयांची घसरण झाल्याची नोंद घेतली गेली.