जळगाव : केंद्र सरकारने आयात शुल्क वाढविल्यानंतर शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने, चांदीच्या दरात विक्रमी दरवाढ झाल्याचे दिसून आले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडताच दोन्ही धातुंच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. त्यामुळे दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला.

केंद्र सरकारने अलीकडेच आयात शुल्कात केलेल्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये अचानक मोठी वाढ झाली. या निर्णयाचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर झाला. अनेकांनी वाढलेल्या दरांचा फायदा घेत नफा वसुलीसाठी विक्री सुरू केली. दुसरीकडे, नवीन खरेदी करण्यास ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांनीही काही प्रमाणात विलंब करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाजारातील व्यवहारांची गती मंदावली. प्रत्यक्ष मागणी आणखी कमकुवत झाली. दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही सोने आणि चांदीचे दर घसरले. या घसरणीमागे महागाई आणि वाढते व्याजदर ही कारणे असल्याचे मानले जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता, व्याजदरवाढीमुळे दीर्घकाळ कोणताही दिलासा मिळणार नाही, असे दिसते.

दरम्यान, अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या उच्चस्तरीय चर्चांकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंच्या बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्यापार, आयात शुल्क, तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्बंध आणि जागतिक आर्थिक धोरणांबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे बाजारात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांचा आढावा घेत असले तरी, डॉलरच्या मजबुतीमुळे आणि नफा वसुलीच्या वाढलेल्या हालचालींमुळे सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही शुक्रवारी सोन्याचा दर ०.८० टक्क्यांनी कमी होऊन ४६१३.१९ डॉलरपर्यंत घसरला. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. स्पॉट चांदीचा दर ३.१ टक्क्यांनी खाली येत ८०.९३ डॉलर प्रति औंसवर पोहोचला.

सोने किती घसरले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ९२७० रुपयांची वाढ झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६६,२४२ रुपयांपर्यंत वधारले होते. तर गुरुवारी आणखी ६१८ रुपयांची वाढ झाल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६६,८६० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ३६०५ रुपयांची घट नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६३,२५५ रुपयांपर्यंत खाली आले.

चांदी किती घसरली?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी तब्बल २३,६९० रुपयांची वाढ झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो ३,०१,७९० रुपयांपर्यंत वधारली होती. तर गुरुवारी कोणतीच घडामोड न झाल्याने दर ३,०१,७९० रुपयांवर स्थिरावले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडताच तब्बल २१,६३० रुपयांची घसरण झाल्याने चांदी २,८०,१६० रुपयांपर्यंत खाली आली.