जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी सोने, चांदी दरात मोठी दरवाढ नोंदवली गेल्याने एप्रिल महिन्याची दणक्यात सुरुवात झाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी गुरुवारी सकाळी दोन्ही धातुंचे दर कोसळल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. सुवर्ण बाजारपेठेत सकाळपासून खरेदीची लगबग दिसून आली. इराण–इस्रायल–अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक बाजारपेठेत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
या घडामोडींचा परिणाम थेट शेअर बाजार, कच्चे तेल, चलन आणि मौल्यवान धातुंवर दिसून येत आहे. विशेषतः सोने आणि चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार सुरू आहेत. गुरुवारी सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविषयीच्या आक्रमक वक्तव्यांमुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला. भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली.
ज्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्याचवेळी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ नोंदवली गेली. ज्यामुळे महागाईबाबतच्या चिंताही वाढल्या. सामान्यतः अशा तणावपूर्ण परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढतात, असा ट्रेंड पूर्वी पाहायला मिळाला आहे. मात्र, यावेळी चित्र वेगळे दिसत आहे.
बाजारातील मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीमुळे आणि नफा वसुलीमुळे सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत. दरवाढीमागील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय रुपयाची स्थिती. आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे रुपयाची घसरण थांबली असून, रुपया डॉलरच्या तुलनेत काहीसा मजबूत झाला आहे. रुपया मजबूत झाल्यास आयात होणाऱ्या सोन्याचा खर्च कमी होतो, त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती कमी होण्यास मदत होते.
तसेच, काही गुंतवणूकदार रोख तरलता टिकवण्यासाठी सोने-चांदी विक्रीकडे वळल्याचेही दिसून येत आहे. जागतिक अनिश्चितता, राजकीय वक्तव्ये आणि आर्थिक हालचाली यांचा एकत्रित परिणाम म्हणून पारंपरिक समीकरण बदलताना दिसत आहे. गुरुवारच्या दर घसरणीमुळे सोने आणि चांदी दोन्ही काही प्रमाणात स्वस्त झाले असून, ग्राहकांसाठी ही खरेदीची संधी मानली जात आहे.
सोन्याचे दर किती कमी झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी कोणतीच वाढ अथवा घट न झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५२ हजार ४४० रुपयांवर स्थिरावले होते. तर बुधवारी ३५०२ रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५५ हजार ९४२ रुपयांपर्यंत वधारले होते. मात्र, गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ४७३८ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५१ हजार २०४ रुपयांपर्यंत घसरले.
चांदीचे दर किती कमी झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी ४१२० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४९ हजार २६० रुपयांपर्यंत पोहचले होते. तर बुधवारी आणखी ४१२० रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५३ हजार ३८० रुपयांपर्यंत वधारले होते. मात्र, गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर तब्बल १२ हजार ३६० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४१ हजार ०० रुपयांपर्यंत घसरले.
