जळगाव : अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवून तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी सोने, चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर दोन्ही धातुंचा तोरा उतरल्याने ग्राहकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, जागतिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर दिसून येत आहे.
अमेरिकेकडून दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली होती. मात्र, युद्धविरामानंतरही परिस्थिती पूर्णतः स्थिर नसल्याने आता सोन्याच्या दरात पुन्हा घसरण होत असल्याचे चित्र आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, युद्धविराम किती काळ टिकेल याबाबत अजूनही अनिश्चितता कायम असल्याने गुंतवणूकदार सावध भूमिकेत आहेत. या पार्श्वभूमीवर काही गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे दरात सुरुवातीला वाढ झाली. मात्र त्यानंतर नफावसूली आणि जागतिक बाजारातील बदलत्या संकेतांमुळे सोन्याच्या किमतीत घसरण सुरू झाली आहे. गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारातही सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून आले. पिवळ्या धातूच्या किमतीत सुरुवातीला वाढ झाली असली तरी ती टिकून राहू शकली नाही. चांदीच्या दरातही याचप्रमाणे अस्थिरता दिसून आली आहे.
डॉलरच्या मजबुतीचा आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचाही दोन्ही धातुंच्या दरांवर प्रभाव पडत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. दरम्यान, सोने आणि चांदी दराची सध्याची घसरण ही ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक संधी मानली जात आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामासाठी सोने खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी ही योग्य वेळ ठरू शकते, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, बाजारातील अनिश्चितता लक्षात घेता घाईने निर्णय न घेता नवीनतम दर आणि भविष्यातील ट्रेंडचा अभ्यास करूनच गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. एकूणच, अमेरिका, इस्रायल-इराण संघर्षानंतरही बाजारातील अस्थिरता कायम असून सोने आणि चांदीच्या दरात पुढील काही दिवसांतही चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोन्याचे दर आता किती?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी १३०९ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,६७६ रुपयांपर्यंत खाली आले होते. तर बुधवारी ३४७२ रुपयांची वाढ झाल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५६,१४८ रुपयांपर्यंत वधारले होते. मात्र, गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर १३३९ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५४,८०९ रुपयांपर्यंत खाली आले.
चांदीचे दर आता किती?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी ४१२० घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,४४,११० रुपयांपर्यंत खाली आले होते. तर बुधवारी तब्बल १३,३९० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,५७,५०० रुपयांपर्यंत वधारले होते. मात्र, गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ८२४० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४९,२६० रुपयांपर्यंत घसरले.
