जळगाव: शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या सोने, चांदीच्या दर घसरणीला आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी ब्रेक लागला. दोन्ही धातुंच्या दरात मोठी वाढ झाल्याने लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी करण्याकरिता आलेल्या ग्राहकांनी थोडी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण अनुभवणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतींनी शनिवारी पुन्हा वेग घेतल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेवर स्पष्टपणे जाणवत असताना, विशेषतः पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे सोन्यासह चांदीच्या किमतींनाही काही प्रमाणात आधार मिळाल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही मौल्यवान धातुंच्या किमतीत बरीच घसरण झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला. जळगावसह राज्यातील अनेक शहरांमध्ये सोने-चांदीच्या दरात सातत्याने घट नोंदवली जात होती. त्यामुळे ग्राहकांमध्ये खरेदीची उत्सुकता वाढली होती. मात्र, शनिवारी अचानक सोने-चांदीच्या दराने पुन्हा वाढीचा कल दर्शवला.

आणखी दरवाढीची शक्यता

जळगाव ही संपूर्ण देशात सोन्याच्या व्यापारासाठी ओळखली जाणारी मोठी बाजारपेठ आहे. येथे बाराही महिने मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीची खरेदी-विक्री केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारातील बदलांचा थेट परिणाम या बाजारावरही दिसून येतो. व्यापाऱ्यांच्या मते, ग्राहकांकडून सध्या मर्यादित प्रमाणात खरेदी होत असली, तरी दरातील चढ-उतारामुळे बाजारात काही प्रमाणात उत्सुकता कायम आहे.

आगामी काळात सोन्याच्या किमतींची दिशा प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असेल. विशेषतः मध्यपूर्वेतील तणाव, अमेरिकन डॉलरची हालचाल, जागतिक महागाईचे प्रमाण तसेच प्रमुख देशांच्या केंद्रीय बँकांचे धोरण यांचा सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होऊ शकतो. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरता कायम राहिली, तर सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोन्याचे दर किती वाढले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी १७५१ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६६ हजार ३६ रुपयांपर्यंत खाली आले होते. तर शुक्रवारी पुन्हा २०६० रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ९७६ रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी २१६३ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६६ हजार १३९ रुपयांपर्यंत पोहोचले.

चांदीचे दर किती वाढले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी १० हजार ३०० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७५ हजार रुपयांपर्यंत घसरले होते. तर शुक्रवारी पुन्हा १०३० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७३ हजार ९८० रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी तब्बल ४१२० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७८ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचले.