जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात आणखी वाढ नोंदवली गेली. दोन्ही धातूंचे दर अचानक वधारल्याने दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. दरवाढ लक्षात घेऊन अनेकांनी सावध भूमिका घेतल्याचेही दिसून आले.
जागतिक सराफा बाजारात मौल्यवान धातूंना पुन्हा एकदा तेजीचे वेध लागले असून, सोन्याच्या किमतींनी सलग चौथ्या व्यवहार सत्रात वाढ नोंदवत सात आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळल्याचे चित्र आहे. अमेरिकन डॉलरमधील कमजोरी, ट्रेझरी बाँडवरील घसरते परतावे आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चिततेचे वातावरण कायम असताना गुंतवणूकदारांनी जोखीम असलेल्या मालमत्तेपेक्षा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून बाजारातील सकारात्मक वातावरण कायम आहे.
डॉलरच्या कमजोरीचा सोन्याला फायदा
बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिकन डॉलर निर्देशांक १०० च्या खाली घसरल्याने इतर चलनधारकांसाठी सोने खरेदी तुलनेने स्वस्त झाले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली असून त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे. याशिवाय अमेरिकेच्या ट्रेझरी बाँडवरील परताव्यात झालेली घसरणही सोन्याला आधार देत आहे. बाँडवरील परतावा कमी झाल्यास व्याज न देणाऱ्या सोन्यात गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतो. अमेरिका-इराण संघर्षातील तणाव कमी झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये नरमाई आली आहे. तेल स्वस्त झाल्याने महागाईचा दबाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याचवेळी जागतिक आर्थिक धोरणांबाबत गुंतवणूकदार अधिक सतर्क झाले आहेत. या परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.
चांदीलाही तेजीचा आधार
सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही वाढ कायम आहे. औद्योगिक वापर आणि गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे चांदीच्या भावालाही आधार मिळत आहे. त्यामुळे सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये तेजीचे वातावरण कायम असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय कमॉडिटी एक्स्चेंज कॉमेक्सवर सोन्याचा भाव गुरुवारी सकाळच्या सत्रात ०.३६ टक्क्यांनी वाढून ४,३२० डॉलर प्रति औंस इतका झाला. त्याचवेळी चांदीचा भाव ०.१२ टक्क्यांनी वाढून ६२.३६ डॉलर प्रति औंस नोंदविण्यात आला. डॉलरमध्ये आणखी कमजोरी कायम राहिली आणि जागतिक अनिश्चितता वाढली, तर मौल्यवान धातूंमध्ये तेजीचा कल पुढेही सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोन्याचे दर आता किती?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी ३०९ रुपयांची किरकोळ वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४७,५९९ रुपयांपर्यंत होते. तर बुधवारी २८८४ रुपयांची दरवाढ झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५०,१७४ रुपयांपर्यंत पोहचले होते. गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ३०९० रुपयांची वाढ झाली. परिणामी, सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,२६४ रुपयांपर्यंत वधारले. दोनच दिवसांत सोन्याचे दर ५९७४ रुपयांनी महागल्याचे दिसून आले.
चांदीचे दर आता किती?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी मंगळवारी कोणतीच घडामोड न झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह २,२८,६६० रुपयांवर स्थिरावले होते. तर बुधवारी तब्बल ६१८० रुपयांची दरवाढ झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २,३४,८४० रुपयांपर्यंत पोहचली होती. गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी २०६० रुपयांची दरवाढ झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३६,९०० रुपयांपर्यंत वधारली. दोनच दिवसांत चांदीचे दर ८२४० रुपयांनी महागल्याचे दिसून आले.
