जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेली सोने आणि चांदीच्या दरातील वाढ बुधवारी कायम राहिल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला. ऐन लग्नसराईत दोन्ही धातुंचे दर पुन्हा वधारल्याने सुवर्ण व्यावसायिकांनीही डोक्याला हात लावून घेतला.अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या आगामी धोरणात्मक बैठकीत व्याजदर कपातीची शक्यता कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला आहे.

त्यामुळे आशियाई व्यवहाराच्या वेळेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली. मंगळवारी घसरणीसह बंद झाल्यानंतर बुधवारी सकाळी बाजाराने जोरदार पुनरागमन करत हिरव्या निशाणावर व्यवहार सुरू केला. या तेजीमुळे मौल्यवान धातुंच्या गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याच्या किमतीत ०.४८ टक्क्यांची वाढ होऊन दर ५२०२ डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

डॉलर निर्देशांकातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान म्हणून मागणी वाढताना दिसून आली.चांदीनेही बुधवारी दमदार कामगिरी करत ०.९६ टक्क्यांची उसळी घेतली. आशियाई बाजारात स्पॉट चांदीचे दर ८८.२५ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते.गेल्या काही आठवड्यांपासून चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ दिसून येत असून, औद्योगिक मागणीतील वाढ आणि इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा क्षेत्रातील वापरामुळे तिची मागणी अधिक बळकट झाली आहे.

भारतीय किरकोळ बाजारातही आंतरराष्ट्रीय दरांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला. रुपयातील किंचित कमकुवतपणा आणि आयात खर्चातील वाढ यामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सुवर्ण बाजारपेठेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली असून, चांदीचे दरही उच्चांकाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, भू-राजकीय तणाव आणि जागतिक महागाईची चिंता, या घटकांमुळे दोन्ही मौल्यवान धातुंना आधार मिळत आहे.

सोन्याच्या दरात किती वाढ?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी १४४२ रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ५६४ रुपयांपर्यंत पोहोचले होते. तर मंगळवारी ७२१ रुपयांची वाढ झाल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार २८५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी ६१८ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार ९०३ रुपयांपर्यंत वधारले.

चांदीच्या दरात किती वाढ?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी ११ हजार ३३० रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७९ हजार १३० रुपयांपर्यंत पोहोचले होते. तर मंगळवारी १०३० रुपयांची वाढ झाल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८० हजार १६० रुपयांपर्यंत पोहचले होते. बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी २०६० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८२ हजार २२० रुपयांपर्यंत वधारले.