जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात फार मोठी घडामोड झाली नव्हती. चांदीच्या दरातही घसरणीचा कल दिसून आला होता. मात्र, मंगळवारी सकाळी बाजारपेठे उघडताच दोन्ही धातुंना पुन्हा झळाली मिळाली. लग्नसराई तसेच सणासुदीसाठी दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांमध्ये त्यामुळे खळबळ उडाली.
मंगळवारी जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे मौल्यवान धातुंना तेजी मिळाल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्सवरही सकाळच्या सुमारास सोन्याचा दर ०.४७ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ४,७८९ डॉलरवर पोहोचला. त्याचवेळी चांदीच्या किमतीत अधिक वेगाने वाढ दिसून आल्याने ती १.९० टक्क्यांनी उसळी घेत प्रति औंस ७७ डॉलरवर व्यवहार करत होती. गेल्या काही दिवसांत होर्मुझ सामुद्रधुनी रोखण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. मात्र, आता परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानुसार इराणी अधिकाऱ्यांनी अमेरिकेशी संपर्क साधून तणाव कमी करण्यासाठी वाटाघाटीची तयारी दर्शवली आहे. तसेच, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनीही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत शांतता चर्चेसाठी तेहरान तयार असल्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण काहीसे कमी झाले असले तरी, गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीकडे पुन्हा वळण्यास सुरुवात केल्याचे सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञ सांगतात. आगामी काळात राजनैतिक घडामोडींवर मौल्यवान धातुंच्या किमतींचा कल अवलंबून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भारतीय बाजारातही याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता असून, सोने आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत.
सोन्याचे दर किती वधारले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी १०३ रुपयांची किरकोळ घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५५,५३० रुपयांवर स्थिरावले होते. तर सोमवारी आणखी ३०९ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५५,२२१ रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर १४४२ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५६,६६३ रुपयांपर्यंत वधारले.
चांदीचे दर किती वधारले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी २०६० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,५५,४४० रुपयांपर्यंत पोहचले होते. तर सोमवारी ५१५० रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति किलो २,५०,२९० रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर तब्बल ८२४० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,५८,५३० रुपयांपर्यंत वधारले.
