जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने थोडेफार चढउतार सुरु होते. मात्र, बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर दोन्ही धातूंचे दर अचानक उसळल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली. अलीकडील दर घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
बुधवारी सकाळच्या सत्रात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांनी तसेच गुंतवणूकदारांनी नवीनतम दरांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कॉमेक्स एक्सचेंजवरही सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत सोन्याचा भाव ०.८५ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ४,१८८.१० डॉलर इतका नोंदवला गेला. मागील काही दिवसांतील घसरणीनंतर ही वाढ बाजारात सकारात्मक संकेत मानली जात आहे. चांदीच्या किमतींमध्येही मजबूत तेजी दिसून आली. कॉमेक्सवर चांदीचा भाव १.३४ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ६१.०५५ डॉलर इतका नोंदवला गेला. सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये अधिक वेगाने वाढ झाल्याने औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल याचा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता
बाजार विश्लेषकांच्या मते, जागतिक आर्थिक घडामोडींसह डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार, मध्यवर्ती बँकांची धोरणे आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींना आधार मिळत आहे. आगामी काळातही आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीनुसार सोने आणि चांदीच्या दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारातही आंतरराष्ट्रीय दरांचा परिणाम दिसून येत असून, सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणारे ग्राहक, तसेच गुंतवणुकीसाठी सोने किंवा चांदी घेण्याचा विचार करणाऱ्यांनी व्यवहार करण्यापूर्वी आपल्या शहरातील अद्ययावत दर तपासूनच निर्णय घेणे उचित ठरेल.
सोन्याचे दर किती वधारले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी ३०९ रुपयांची किरकोळ वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४७,५९९ रुपयांपर्यंत पोहचले होते. बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी १७५१ रुपयांची दरवाढ झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४९,०४१ रुपयांपर्यंत वधारले.
चांदीचे दर किती वधारले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी कोणतीच घडामोड न झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह २,२८,६६० रुपयांपर्यंत स्थिर होते. बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर तब्बल ४१२० रुपयांची दरवाढ नोंदविण्यात आल्याने चांदी जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २,३२,७८० रुपयांपर्यंत वधारली.
