जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी सोने आणि चांदीचे दर स्थिर होते. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दोन्ही धातुंचे दर वाढतात की घटतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात सोन्यात हालचाल दिसून आली, मात्र चांदीचे दर स्थिरच राहिले. तज्ज्ञांच्या मते, हा बदल आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरचे मूल्य आणि गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफावसुलीमुळे झाला आहे.

अमेरिका, इस्रायल-इराणमधील वाढत्या तणावाचा परिणाम केवळ मध्यपूर्वेत मर्यादित न राहता संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास गुंतवणूकदार सहसा सुरक्षित पर्यायांकडे वळतात, ज्यामध्ये सोन्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

याच पार्श्वभूमीवर भारतातील सराफा बाजारही अस्थिर झाला आहे. सोमवारी देखील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण झाली. मागील आठवड्यात मोठ्या उंचीवर पोहचलेले सोन्याचे दर या आठवड्याच्या सुरुवातीलाच खाली आले. त्यामुळे आज सोने तुलनेने स्वस्त झाले असून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

याउलट, चांदीच्या दरात सोमवारी कोणताही मोठा बदल झाला नाही. चांदीचे दर स्थिर राहिल्यामुळे बाजारात काही प्रमाणात स्थैर्य दिसून आले. चांदीचा वापर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तिच्या किंमतीवर औद्योगिक मागणीचाही प्रभाव असतो. सध्या ही मागणी स्थिर असल्याने दरात मोठी हालचाल दिसली नाही.

दरम्यान, अमेरिका, इस्रायल-इराण संघर्षामुळे वाढलेली जागतिक अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार, अमेरिकेच्या व्याजदर धोरणे आणि डॉलर इंडेक्समधील बदल यांचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होत आहे. त्यामुळे बाजारात अस्थिरता कायम असून गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला तर सोन्याच्या दरात पुन्हा तेजी येऊ शकते.

अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतील. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यास दरात पुन्हा घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याच्या दरात झालेली घसरण ही ग्राहकांसाठी खरेदीची संधी मानली जात आहे.

सोन्याच्या दराची काय स्थिती?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी कोणतीच वाढ अथवा घट न झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,७७९ रुपयांवर स्थिरावले होते. मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ८२४ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,९५५ रुपयांपर्यंत खाली आले.

चांदीच्या दराची काय स्थिती?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी दरात कोणतीच वाढ अथवा घट न झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४५,१४० रुपयांवर स्थिरावले होते. मात्र, सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सकाळी बाजारपेठ उघडल्यावर कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. त्यामुळे चांदीचे दर स्थिर राहिले.