जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदवली गेल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या पुन्हा बदल नोंदविला गेल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.
जागतिक पातळीवरील वाढत्या राजकीय व आर्थिक अनिश्चिततेमुळे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवली गेली. अमेरिकेतील टॅरिफ धोरणाबाबत सुरू असलेली अनिश्चितता आणि अमेरिका–इराण दरम्यानच्या अणुकार्यक्रमासंबंधी चर्चेतील अस्पष्टता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळताना दिसून आले.
अमेरिका आणि इराण यांच्यात तेहरानच्या अणुकार्यक्रमावरून चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. गुरुवारी चाललेल्या बैठकीनंतर काही प्रमाणात प्रगती झाल्याचे संकेत मिळाले असले, तरी कोणताही ठोस करार जाहीर झालेला नाही. संभाव्य अमेरिकन लष्करी कारवाईची शक्यता अद्याप पूर्णपणे नाकारलेली नसल्याने मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण कायम आहे. या पार्श्वभूमीवर, त्या प्रदेशात लष्करी तयारी सुरू असल्याच्या बातम्यांनी गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी वाढवली आहे.
याचबरोबर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्षामुळेही आशियाई बाजारपेठांवर दबाव निर्माण झाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर बाजारात घसरण झाली असून गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीसारख्या पारंपरिक सुरक्षित पर्यायांकडे कल दर्शविला आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड प्रति औंस सुमारे ५१८७.३९ डॉलरवर स्थिर राहिले. तर स्पॉट चांदी ०.६ टक्क्यांची वाढ झाल्याने प्रति औंस ८८.८१ डॉलरपर्यंत पोहोचली. तज्ज्ञांच्या मते, जागतिक राजकीय घडामोडी आणि आर्थिक धोरणांमधील अनिश्चितता कायम राहिल्यास सोने आणि चांदी यासारख्या मौल्यवान धातुंना पुढील काळातही पाठबळ मिळू शकते. सोने आणि चांदी हे पारंपरिकदृष्ट्या सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानले जातात. त्यामुळेच सध्याच्या अस्थिर वातावरणात या धातुंच्या दरात वाढ दिसून येत आहे.
सोन्याच्या दराची काय स्थिती?
जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ३०९ रुपयांची किरकोळ वाढ नोंदवली गेल्यानंतर २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार ५९४ रुपयांपर्यंत पोहचले होते. तर गुरुवारी दिवसभरात ११३३ रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ४६१ रुपयांपर्यंत खाली आले होते. शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा ३०९ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ७७० रुपयांपर्यंत वधारले.
चांदीच्या दराची काय स्थिती?
जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी १०३० रुपयांची वाढ झाल्यानंतर चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८१ हजार १९० रुपयांपर्यंत पोहचले होते. तर गुरुवारी दिवसभरात तब्बल ८२४० रुपयांची घट नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७२ हजार ९५० रुपयांपर्यंत खाली आले होते. शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा तब्बल ८२४० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८१ हजार १९० रुपयांपर्यंत वधारले.

