जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. विशेषतः सोने अडीच महिन्यांच्या कालखंडानंतर दीड लाखांच्या खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. चांदीही आता अडीच लाखांच्या खाली गेली आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होताना दिसत आहे.

देशभरातील सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. मात्र, सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये गेल्या दोन दिवसांत लक्षणीय घसरण झाल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराकडे वेधले गेले आहे. २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदविण्यात आली असून चांदीच्या किमतींनाही फटका बसला आहे. काही आठवड्यांपूर्वी विक्रमी पातळी गाठणाऱ्या सोन्याने आता बऱ्यापैकी खाली आल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिक मास, सणासुदीची खरेदी आणि गुंतवणुकीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, या घसरणीमागे अनेक आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदारांचे आकर्षण सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपेक्षा रोखे आणि इतर वित्तीय साधनांकडे वळते. परिणामी सोन्याच्या मागणीत घट होऊन किमतींवर दबाव निर्माण होतो.

याशिवाय अमेरिकन डॉलरच्या मजबुतीचाही सोन्यावर परिणाम होत आहे. डॉलर मजबूत झाल्यास इतर चलनधारकांसाठी सोने महाग होते, त्यामुळे जागतिक मागणी कमी होते. त्याचबरोबर शेअर बाजारातील अस्थिरता, महागाईबाबतची अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडी यांचाही सोन्या-चांदीच्या दरांवर प्रभाव पडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अलीकडेच सोन्याच्या किमती सहा महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचल्या होत्या. त्यानंतर काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी बाजारातील अनिश्चितता अद्याप कायम आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांतही दरांमध्ये मोठे चढ-उतार दिसून येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. किमती कमी झाल्यामुळे किरकोळ ग्राहकांकडून खरेदीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, मोठ्या गुंतवणुकीबाबत अनेक जण प्रतीक्षा करण्याची भूमिका घेत आहेत. आगामी काळात जागतिक परिस्थिती कशी बदलते यावर सोन्या-चांदीच्या दरांची दिशा अवलंबून राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकूणच, मध्य पूर्वेतील तणाव तसेच अमेरिकेतील आर्थिक धोरणे आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यांचा प्रभाव आगामी काळातही सराफा बाजारावर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सोन्याचे दर आता नेमके किती?

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ४३२६ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५१,९२५ रुपयांपर्यंत खाली आले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी २०६० रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४९,८६५ रुपयांपर्यंत घसरले. यापूर्वी २४ मार्च रोजी सोने १,४६,५६९ रुपयांपर्यंत कमी झाले होते.

चांदीचे दर आता नेमके किती?

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी तब्बल १२,३६० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,४४,११० रुपयांपर्यंत खाली आले होते. दुसर्‍या दिवशी गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी १०३० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,४३,०८० रुपयांपर्यंत घसरली.