Jalgaon Gold Rate Today drops sharply along with silver price today in Jalgaon Sarafa market : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी सोने, चांदीच्या दरात मोठी घट नोंदवली गेली होती. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी घसरण कायम राहिल्याने दोन्ही धातुंचे दर आणखी घसरले. परिणामी, ग्राहकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. विशेषतः लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने दागिने खरेदीची तयारी करणाऱ्यांना दर कपातीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर मोठ्या गुंतवणूकदारांनाही काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील आर्थिक घडामोडींमुळे गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. जागतिक स्तरावरील वाढती महागाई, अमेरिकन डॉलरची सतत मजबूत होत असलेली स्थिती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे मौल्यवान धातुंवरील दबाव वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील आर्थिक धोरणांमुळे डॉलर अधिक मजबूत होत असून, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या जागतिक मागणीवर होत आहे. डॉलर मजबूत झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात सोने महाग होते. आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल इतर पर्यायांकडे वळतो. याशिवाय अमेरिकेच्या १० वर्षीय ट्रेझरी यील्ड्समध्ये झालेली वाढही सोन्याच्या किमतींसाठी प्रतिकूल मानली जात आहे. ट्रेझरी यील्ड्स वाढल्याने गुंतवणूकदार सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या पर्यायांकडे आकर्षित होतात. त्यामुळे सोन्यासारख्या नियमित उत्पन्न न देणाऱ्या धातुतील गुंतवणूक काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे.
दरम्यान, भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठल्याने देशांतर्गत बाजारातील परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. रुपयातील कमजोरीमुळे आयात खर्च वाढल्याने भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर सोने आयात करणाऱ्या देशात त्याचा थेट परिणाम स्थानिक दरांवर झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत जागतिक आर्थिक परिस्थिती, अमेरिकेचे व्याजदर, डॉलरची स्थिती आणि कच्च्या तेलाचे दर यावर सोने-चांदीच्या किमतींचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि चीनमधील संबंधांवरही जागतिक बाजाराचे लक्ष केंद्रित झाले आहे. बीजिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या बैठकीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या बैठकीतून व्यापार, अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत कोणते संकेत मिळतात यावर जागतिक बाजाराची दिशा ठरणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे सध्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये अस्थिरतेचे वातावरण कायम असून, ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघेही पुढील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
सोन्याचे दर किती कमी झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी ६१८ रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६६,८६० रुपयांपर्यंत पोहचले होते. तर शुक्रवारी दिवसभरात ३६०५ रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६३,२५५ रुपयांपर्यंत खाली आले होते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा ५१३ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६२,७४२ रुपयापर्यंत घसरले.
चांदीचे दर किती कमी झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी कोणतीच घडामोड न झाल्याने चांदीचे दर प्रति किलो ३,०१,७९० रुपयांवर स्थिरावले होते. तर शुक्रवारी दिवसभरात तब्बल २०,६०० रुपयांची घट झाल्याने चांदी २,८१,१९० रुपयांपर्यंत खाली आली होती. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा ५१५० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,७६,०४९ रुपयापर्यंत घसरली.
